कोल्हापूर

डोळ्यांच्या साथीचा फैलाव

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात डोळे येण्याची साथ दोन महिन्यांपासून सुरूअसून आता त्याचा सर्वदूर फैलाव झाला आहे. अ‍ॅडिनो विषाणूमुळे डोळे येत असून जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक रुग्णसंख्या 4465 इतकी आहे. तर जिल्ह्यात एकूण 8969 रुग्ण आढळले आहेत. ही रुग्णसंख्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडील आहे. खासगी रुग्णालयांत देखील डोळे आल्याने औषधोपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे. डोळ्यांच्या साथीमुळे 'आय ड्रॉप'चा तुटवडा जाणवत आहे. दिवसेंदिवस डोळे येण्याचे रुग्ण वाढत असल्याची माहिती नेत्रतज्ज्ञांनी दिली.

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) राज्यातील रुग्णांचे नमुने गोळा करून तपासणी केली आहे. त्याचा अहवाल संस्थेने आरोग्य विभागाकडे सादर केला आहे; पण रुग्णांना नेमका कशामुळे हा त्रास होत आहे, याची माहिती सार्वजनिक करणे गरजेचे असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे. डोळ्यांना संसर्ग हा विषाणू, जीवाणू की अ‍ॅलर्जीमुळे झाला, हे तपासण्याची गरज आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा डोळ्यांच्या साथीचे प्रमाण वाढल्याचे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.

कोल्हापूर शहरासह करवीर, कागल, पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले, गडहिंग्लज, चंदगड, आजरा, भुदरगड, शाहूवाडी, शिरोळ, गगनबवाडा, राधानगरी तालुक्यांतील ग्रामीण भागात प्रत्येक गावात डोळ्याच्या संसर्गाचे रुग्ण आहेत.

या उपाययोजना करा

पावसामुळे माश्या किंवा डासांचा प्रादुर्भाव असेल तर तो परिसर स्वच्छ ठेवा. ज्या व्यक्तीला डोळे आले असतील त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. डोळ्यांना वारंवार हात लावू नये, तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. कपडे, टॉवेल आणि अंथरूण स्वतंत्र ठेवावे. उन्हात काळ्या रंगाचा चष्मा वापरावा.

संसर्गाची लक्षणे

डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे अ‍ॅडिनो व्हायरसमुळे होतो. डोळ्याला खाज सुटणे, डोळे लाल होणे, टोचल्यासारखे वाटणे, सकाळी उठल्यानंतर पापण्या चिकटणे, पापण्या सुजणे आणि संसर्ग झालेल्या डोळ्यांतून पांढरा स्त्राव येणे ही डोळे आल्याची लक्षणे आहेत.

नोंद करण्यास टाळाटाळ

डोळे आलेल्या रुग्णांची माहिती खासगी रुग्णालयांनी आरोग्य केंद्रांना कळवावी, अशी सूचना दवाखान्यांना दिली आहे. मात्र, काही खासगी दवाखान्यांतून रुग्णांची माहितीच दिली जात नाही. गावागावांत डोळे आलेले रुग्ण आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT