कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातही अनेक पंपावर शनिवारीही डिझेलची टंचाई होती. काही अपवाद वगळता बहुतांशी पंपांवर पेट्रोलचा पुरवठा मात्र सुरळीत होता. डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन दिवसभर अलर्ट मोडवर होते. पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. रविवार (दि. 24) पासून डिझेलचा समाधानकारक पुरवठा होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल टंचाईसद़ृश परिस्थिती आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेलचा तुटवडा अधिक जाणवत आहे. ग्रामीण भागात हे चित्र अधिक प्रकर्षाने दिसत आहे. वेळेवर डिझेल मिळत नसल्याने शेतीसह अन्य कामांवरही परिणाम जाणवू लागला आहे. डिझेलसाठी लांबलचक रांगा लागल्याचे चित्र जिल्ह्यात तूर्त जरी नसले तरी जवळच्या ठिकाणी डिझेल मिळण्यासाठी एक-दोन दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
शहरासह जिल्ह्यातही पेट्रोलचा तुटवडा नाही. मात्र, दररोज सरासरी 10 ते 12 पंप कोरडे पडत आहेत. एका पंपावर पेट्रोल संपले की, नजीकच्या दुसर्या पंपावर वाहनधारकांचा ताण वाढत आहे. परिणामी त्यांच्या विक्रीत वाढ होऊन तोही पंप लवकर बंद पडत चालल्याचेही चित्र आहे. यामुळे काही ठिकाणी पेट्रोलसाठी रांगा लागत आहेत.
पुरवठा अधिकारी पेट्रोलियम कंपनी अधिकार्यांच्या संपर्कात
डिझेल आणि पेट्रोल पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण दिवसभर कार्यालयात तळ ठोकून होते. डॉ. राठोड यांनी तेल पुरवठा कंपन्यांच्या अधिकार्यांशी संपर्क करून जिल्ह्यातील पुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना दिल्या. जिल्हा पुरवठा अधिकारीही दिवसभर संबंधित पेट्रोलियम कंपनीच्या अधिकार्यांच्या संपर्कात होत्या.
आजपासून पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता
डिझेल घेऊन रेल्वेची वॅगन शनिवारी दुपारी मिरजेत दाखल झाली. मिरज येथील डेपोत डिझेल उतरून घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान डेपोला सोमवारी सुट्टी असते, ती रद्द करावी आणि सोमवारीही पेट्रोल पंप चालकांना डिझेल-पेट्रोल उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी संबंधित अधिकार्यांनी केली. त्यानुसार उद्याही डेपोतून डिझेलचा पुरवठा होईल. त्यामुळे रविवारी सायंकाळनंतर डिझेल पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.