कोल्हापूर : महानगरपालिकेच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला नॅशनल तसेच इंटरनॅशनल हॉकी सामने आयोजित करण्यासाठी फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी (एफआयएच) यांची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. याचे प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले. याबद्दल हॉकीपटूंनी मैदानावर शुक्रवारी एकच जल्लोष करत साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी हॉकी संघटक विजय साळोखे-सरदार, सागर जाधव, योगेश देशपांडे, संतोष चौगले, नजीर मुल्ला यांच्यासह मुले-मुली हॉकीपटू उपस्थित होते.
ऑस्ट्रेलिया येथील फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी असोसिएशनच्या निकषांनुसार आवश्यक असलेले पॉलिटॅन कंपनीचे अत्याधुनिक अॅस्ट्रोटर्फ मैदान महापालिकेच्या वतीने या स्टेडियममध्ये बसविण्यात आले आहे. या अॅस्ट्रोटर्फ मैदानाची फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकीकडून दि. 15 नोव्हेंबर 2025 रोजी तपासणी करण्यात आली होती. तपासणीनंतर मानांकनाचे प्रमाणपत्र कोल्हापूर महानगरपालिकेस प्राप्त झाले आहे. यामुळे मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी सामने खेळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रकल्पासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष-हॉकी संघटक विजय साळोखे-सरदार व त्यांच्या सहकार्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. प्रशासकीय पातळीवरही मनपाच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या ‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय क्रीडा विकास योजनेंतर्गत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे अॅस्ट्रोटर्फयुक्त मैदान व पूरक सुविधा विकसित करण्यासाठी 5.50 कोटींच्या प्रकल्पास केंद्र शासनाची मंजुरी मिळाली होती. प्रकल्पासाठी महापालिकेने 15 व्या वित्त आयोगांतर्गत आपला हिस्सा म्हणून 1 कोटी 46 लाख 45 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. केंद्र शासन व महापालिकेच्या सहभागातून आजअखेर एकूण 6 कोटी 96 लाख 45 हजार रुपये इतका निधी या प्रकल्पासाठी खर्च करण्यात आला आहे.