कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेला हिसडा मारून ८० हजार रुपये किमतीचे दागिने हातोहात लंपास केल्याची घटना मंगळवार पेठ येथील यल्लाम्मा चौकात गुरुवारी सकाळी घडली.
सरिता महेशकुमार माळी (वय ४०, रा. रविवार पेठ, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सरिता व त्यांच्या सासू गुरुवारी मार्निंग वॉक करून यल्लम्मा चौक येथे रस्ता ओलांडत असताना मोटारसायकलीवरून भरधाव वेगाने आलेल्या चोरट्याने माळी यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीच्या दोन सोनसाखळ्या हातोहात लंपास केल्या.
त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला; मात्र संशयित पसार झाले. संशयित हेल्मेटधारी, अंगात काळ्या रंगाचे जर्किंग, निळ्या रंगाची जिन्स पँट, पायात बूट असा त्याचा पेहराव होता.
हॉकी स्टेडियमच्या दिशेने चोरटे पसार झाल्याचे म्हटले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.