कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षण द्यावे. या प्रमुख मागणीसह पंढरपूर व नेवासा येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच या सरकारने तात्काळ मागणीचे परिपत्रक काढावे या मागणीसाठी 23 तारखेला (सोमवार) कोल्हापूर तावडे हॉटेल चौक येथे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखो आंदोलन करण्यात येणार आहे. तरी समाज बांधवांनी या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे, रामचंद्र उर्फ बच्चू बंडगर यांनी केले आहे.
सोमवारी महामार्ग रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड येथील कोल्हापूर जिल्हा धनगर समाजाच्या मध्यवर्ती कार्यालयात बोलविण्यात आलेल्या बैठकीत ज्येष्ठ नेते डांगे व बंडगर यांनी आवाहन केले. माजी नगरसेवक उदय डांगे, बंडू बरगाले, अमोल मरळे आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना बच्चू बंडगर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी आहे. 2014 साली महायुतीचे सरकार असताना पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता. आताही सरकार त्यांचेच आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा या सरकारला पाडल्याशिवाय धनगर समाज स्वस्त बसणार नाही असा इशारा दिला.
यावेळी बापूसाहेब जोम, उमेश करणारे, दीपक ठोंबरे, अमोल पाटील, सुरेश गावडे आदींनी भाषणे केली. यावेळी सागर जोंग, दीपक ठोंबरे, महालिंगा अकिंवाटे, महेश बिरोजे, सागर वाघे, अमोल पुजारी, भीमराव पुजारी, राहुल पुजारी, नवनाथ गावडे, आनंदा बिरोजे आदी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.