धनंजय महाडिक 
कोल्हापूर

तीन महिन्यांत गोकुळमध्ये सत्तांतर होणार : धनंजय महाडिक

Maharashtra Assembly Election : खेबवडेत महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ सभा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या काही नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुती सरकारच्या पाठीशी असल्याचे भासवले. तरीही, दक्षिण विधानसभा मतदारसंघात त्यांची भूमिका वेगळी असल्याचे दिसून येत आहे. कर्मचारी, दूध संस्थांना दमदाटी करण्याचे प्रकार समोर येत आहेत; मात्र आपण घाबरून न जाता योग्य तो निर्णय घ्या. पुढच्या तीन महिन्यांत गोकुळमध्ये सत्तांतर होणार आहे, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

खेबवडे येथे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारसभेत ते नागरिकांशी संवाद साधत होते. ‘गोकुळच्या या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत’, असे सांगितले. महायुतीच्या सर्व उमेदवारांना ताकदीने निवडून देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. आता हेच नेते दक्षिणमधील गोकुळचे कर्मचारी, दूध संस्थांचे संचालक यांना दमदाटी करत आहेत,’ असे त्यांनी सांगितले.

‘गोकुळमध्ये सुरू असणारा गैरकारभार पूर्वीच उघडकीस आला असता, पण आता विधानसभा निवडणुकीनंतर या सगळ्या प्रकारांचा निकाल लागणार आहे. तीन महिन्यांनंतर मात्र गोकुळची सूत्रे सत्ताधार्‍यांच्या हाती राहणार नाहीत. नव्या उमेदीने नव्या लोकांकडे हा कारभार जाणार आहे. दबावतंत्र वापरून राजकारण करू पाहणार्‍यांना याचे परिणाम भोगावे लागतील’, असा इशारा महाडिक यांनी यावेळी दिला.

ते म्हणाले, गोकुळच्या कर्मचारी व दूध संस्थांनी घाबरून न जाता महायुतीच्या पाठीशी उभे राहावे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचेच सरकार स्थापन होणार आहे’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पूर्णतः कटिबद्ध आहोत. गोकुळच्या सर्व भागधारकांच्या कल्याणासाठी आम्ही आजपर्यंत काम केले आहे. त्यामुळे या सर्वांचा विश्वास व पाठिंबा आमच्या सोबत आहे, असेही ते म्हणाले. सभेला मीनाक्षी महाडिक, गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक, शिरोली सरपंच पद्माजा करपे, माजी जिल्हा परिषद सदस्य संध्याराणी बेडगे, प्रताप पाटील, शामराव शिंदे, शाहू चव्हाण, रमेश चौगले, सरपंच राणी लोहार, संजीवनी चौगले, संदीप पाटील, प्रताप मगदूम, मधुकर हवालदार, आप्पासो चौगले, सुभाष पाटील, चंद्रकांत जाधव, सर्जेराव पाटील, शिवाजी चौगले, विश्वास चौगले, अमृत जाधव, धीरज मगदूम, विक्रम कांबळे यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT