मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी धामणी प्रकल्पाचा घळभरणी शुभारंभ File Photo
कोल्हापूर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी धामणी प्रकल्पाचा घळभरणी शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

म्हासुर्लीः पुढारी वृत्तसेवा

बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि धामणी खोऱ्यातील हरितक्रांतीच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असणाऱ्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या घळभरणीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवार दि. ९ रोजी होणार आहे. सन २००० मध्ये पायाभरणी होवून प्रदीर्घ पल्ल्याच्या प्रवासानंतर प्रकल्पाचा होणारा कळस पाहण्याच्या क्षणाची लोकांत आतूरता लागून राहिली आहे. यंत्रणाही गतीमान झाली असून प्रकल्पस्थळी कार्यक्रमाची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू झाली आहे. एकूणच धामणी खोऱ्यातील जनमाणसांत उत्साहाचे वातावरण आहे.

सन १९९६ मध्ये तत्कालिन भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात ३.८५ पाणी साठवण क्षमता असणाऱ्या धामणी मध्यम प्रकल्पास प्रशासकिय मान्यता मिळाली. तर सन २००० मध्ये आघाडी सरकारच्या काळात मंत्री महोदयांच्या उपस्थितीत प्रकल्पकामाचा नारळ फुटुन प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. प्रकल्पाचा ठेका डी.वाय. उप्पर कंपनीकडे होता. सुरुवातीची दोन वर्षे कामाचा झपाटा चालला तर अगदी दोन वर्षातच कामाचा अर्धा - अधिक डोंगर उभा राहिला. प्रकल्पाची दोन-तीन वर्षातच पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू असताना यात प्रकल्पांतर्गत प्रश्नांनी ससेमिरा सुरु करुण प्रकल्पकामाचा मार्ग रोखून धरला.

तत्कालिन पन्हाळा - बावड्याचे आम. विनय कोरे यांनी त्यांच्या प्रयत्नांतून प्रकल्पाची मुहुर्तमेढ रोवली असली तरी वनहद्दीचा प्रश्नही त्यांनी त्यावेळी ताकदीने सोडवत प्रकल्पकामाला उभारी देण्याचा प्रयत्न केला. या प्रश्नाव्यतिरिक्त आणखीही प्रश्नांचा गुंता वाढत गेल्याने प्रकल्पाची चाके थंडावलेलीच राहिली. यात धामणी खोऱ्यातील जनतेचा उद्रेक, तर धामणी खोरे कृती समितीचा सततच्या उठावातून धामणीचा प्रश्न दृष्टीक्षेपात येवू लागला. करवीरचे आमदार. दिवंगत पी.एन.पाटील, मा. आम. चंद्रदीप नरके यांचेही प्रकल्पकामी प्रयत्न झाले असले तरी मागील दोन वर्षापासून प्रकल्प कामाची दीर्घकाळ थंडावलेली चक्रे गतिमान होण्यासाठी आ. प्रकाश आबिटकर यांची मागिल दहा वर्षातील प्रचंड मेहनत प्रकल्पाच्या पथ्यावर पडली आहे.

प्रकल्पाअभावी पाणीटंचाईने आजवरच्या काळात धामणी खोऱ्याची प्रचंड होरपळ झाली. अनेक यातना भोगाव्या लागल्या. इतकी वर्षे हरितकांतीचे स्वप्न उराशी बाळगलेल्या लोकांना स्वप्न साकारणार केव्हा या दिवसाची प्रतीक्षा होती. हेच स्वप्न सत्यात उतरत असून लोकांची प्रतिक्षा आता संपणार आहे.

विजयोत्सव होणार साजरा

डिसेंबर २००० मध्ये धामणी प्रकल्प कामाची मुहुर्तमेढ रोवली जात होती. येथील गावागावांत लोकांच्या उत्साहाला, आनंदाला उधाण आले होते. अगदी घरोघरी सडा रांगोळी काढुन गुढया उभारल्या होत्या. आजघडीस त्याच कामाचा कळस होताना विजयादशमी दसऱ्याच्या पूर्वसंधेला आनंदाचे सोने वाटून विजयोत्सव साजरा होणार आहे.

धामणी प्रकल्प स्थळी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टरने आगमन होणार आहे. जिल्हातील मंत्री, खासदार, आमदार, अधिकारी व मान्यवर मंडळींची उपस्थिती असणार आहे. आत्तापासूनच कार्यक्रमाकडे धामणी खोऱ्यातील लोकांचे डोळे लागले असून कार्यक्रमस्थळी जनसागर लोटणार आहे. या पाश्वभूमीवर प्रशासनाचे योग्य नियोजन चालू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT