कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये 20 मेपर्यंतच देवगड व रत्नागिरी हापूसची आवक होईल असा अंदाज फळ व्यापारी वर्गातून वर्तवला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महिनाभर अगोदरच कोकण हापूस आंब्याचा सीझन संपणार आहे. तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ येथून आंब्याची आवक वाढली आहे. हापूसची आवक अंतिम टप्प्यात असली तरी दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिले आहेत.
कोकणातील हापूस आंब्याला यंदा वातावरणातील बदल, अवकाळी पावसाचा मोठ्याप्रमाणात फटका बसला आहे. वातावरणातील बदलामुळे सुरवातीच्या टप्प्यातच आंब्याचा मोहोर करपून व गळून पडल्याने हापूस आंब्याचे उत्पादन यंदा घटले. केवळ 20 ते 30 टक्केच आंबा बागायतदारांच्या हाती लागला. आखाती देशात सुरू असलेल्या युध्दामुळे निर्यात होणार आंबा देशातच थांबला. त्यामुळे देशातंर्गत बाजारपेठेत आंबा उपलब्ध झाला. मार्चपर्यंत आंब्याचे दर चढेच होते. एप्रिलपासून हळूहळू देवगड, रत्नागिरी हापूस आंब्याचा दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला.
देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याची आवक गतवर्षी 15 जूनपर्यंत सुरू होती. मात्र, यंदा आंब्याचे उत्पादन मोठ्याप्रमाणात घटले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात कोल्हापूर बाजार समितीत महिनाभर अगोदरच कोकणातील आंब्याची आवक थांबेल, असे फळ व्यापार्यांकडून सांगितले जात आहे.
बाजार समितीत आवक होणार्या आंब्याचे दर असे : (12 ते 15 नग पेटी)
देवगड हापूस : 300 ते 800
रत्नागिरी हापूस : 200 ते 500
कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, केरळ : 100 ते 400