कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या कोरीव भागाला काही ठिकाणी तडे गेले आहेत. Pudhari File Photo
कोल्हापूर

अंबाबाई मंदिराचे मूळ शिल्पसौंदर्य कात टाकणार!

पहिल्या टप्प्यात जतन, संवर्धन, पायाभूत सुविधांवर भर : तीन टप्प्यांत होणार विकास आराखड्यातील कामे

पुढारी वृत्तसेवा

अनुराधा कदम

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या 1,447 कोटींच्या विकास आराखड्याला उच्चाधिकार समितीने मंजुरी दिल्यानंतर हालचाली गतिमान झाल्या आहेत. तीन टप्प्यांत आराखड्याची अंमलबजावणी करा, या सूचनेच्या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात अंबाबाई मंदिर परिसरातील 64 योगिनींच्या शिल्पाकृतींचे संवर्धन, आवारातील प्राचीन मंदिरांचे जतन, परिसरातील पायाभूत सुविधा, प्राचीन स्थापत्याची डागडुजी, आवश्यक पुनर्रचना, सुविधा वाढवण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी 143 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुरातत्त्व विभागाने नुकतीच पाहणी करून तांत्रिक निष्कर्षांवर आधारित प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यातील नियोजनाने गती घेतल्याने अंबाबाई मंदिरातील मूळ शिल्पसौंदर्य लवकरच कात टाकणार आहे.

पायाभूत सुविधांनाही महत्त्व

गळती, फरशीला तडे, अंतर्गत विद्युत व्यवस्था, ड्रेनेज सुधारणा, गाभार्‍यातील गळती आणि तडे अशा अनेक समस्या सध्या आहेत. पहिल्या टप्प्यातील विकासकामात या समस्या दूर करून सुविधांनाही महत्त्व देत स्ट्रक्चरल ऑडिट सुरू केले आहे. पायाभूत सुविधांबाबत प्राथमिक स्तरावर काम सुरू करण्यात येणार असून, या सुविधांचाही पुरातत्त्व विभागाच्या प्रस्तावात समावेश केला जाणार आहे.

किरणोत्सव मार्गात अडथळ्यांची जंत्री

अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव ही शास्त्रीय व धार्मिक द़ृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. सूर्यकिरणे देवीच्या मुखावर पडण्यासाठी मंदिराचे वास्तूशास्त्रीय नियोजन अचूक करण्यात आले आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये या मार्गातील अडथळ्यांमुळे किरणोत्सवाचा परिणाम कमी झाला होता. यामध्ये मार्गातील वाढीव बांधकामांचा मोठा अडसर आहे.

64 योगिनी शिल्पांची अवस्था बिकट

मंदिराच्या परिसरातील 64 योगिनींची मूळ मूर्ती शिल्पे अनेक ठिकाणी वेळोवेळी झालेल्या हस्तक्षेपामुळे झाकली गेली होती. सध्या शिल्पांची अवस्था संवर्धनाच्या द़ृष्टीने चिंताजनक मानली जात आहे. गळतीमुळे काही शिल्पांवर पाणी झिरपल्याने दगडाची झीज होण्याची शक्यता आहे. काही शिल्पांवरील विद्रूप रंगकाम मूळ सौंदर्याला बाधा पोहोचवत आहे. दगड सुटलेले किंवा तडे गेलेले भागही आढळले आहेत. विशेषतः, मंदिराच्या भिंतींवर कोरलेल्या योगिनी मूर्तींना खाचा पडल्या आहेत. या 64 योगिनी मंदिरांचा ऐतिहासिक व धार्मिक द़ृष्टिकोनातून फार मोठा वारसा आहे. पहिल्या टप्प्यातील कामांमध्ये या मूर्तींचे जतन, संवर्धन, आणि त्याविषयी माहिती फलक लावणे प्रस्तावित आहे.

पहिल्या टप्प्यातील नियोजित विकासकामे

तडे गेलेल्या दगडांची दुरुस्ती

गळती व ओलावा रोखण्यासाठी उपाय

दगडी शिल्पाकृतीवरील रंग विद्रुपतेची शुद्धी

किरणोत्सव मार्गातील अडथळे निर्मूलन

64 योगिनी शिल्प मूर्तींचे संवर्धन

माहिती फलक व दर्शनीय व्यवस्थापन

मूळ मंदिराशी अंतर्गत मंदिरांची सुसंगत रचना

दगडी तडे आणि शिल्पांची झीज

प्राचीन काळातील दगडी शिल्पांमध्ये अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. भिंतींमध्ये ओलसरपणा, सळ्यांचा गंज, व रंगकामामुळे मूळ शिल्प विद्रूप झाल्याचे चित्र आहे. दुरुस्ती करताना शिल्पांचे मूळ सौंदर्याला नव्याने झळाळी आणण्याचे आव्हान आहे. काही शिल्पांवर अतिसंवेदनशील रासायनिक प्रक्रिया करून त्यांचे मूळ सौंदर्य व शास्त्रीय महत्त्व परत मिळवण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT