कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा या परिसराच्या विकासासाठी मोठी संधी असून येथील लोकांची मानसिकता विकासाला अत्यंत अनुकूल आहे. कोल्हापूरने औद्योगिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात आधीच मोठी प्रगती केली आहे. आता यापुढे आयटी आणि डेटा सेंटर उभारणीसोबतच कोल्हापूरला ‘मेडिकल टुरिझम हब’ म्हणून विकसित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
‘कोल्हापूर फर्स्ट’च्या पहिल्या संयुक्त बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘होलिस्टिक’ द़ृष्टिकोनाची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रभू म्हणाले, अॅलोपॅथी आणि सर्जिकल उपचारांसोबतच निसर्गोपचार आणि आयुर्वेदाची सांगड घातल्यास कोल्हापूर वैद्यकीय पर्यटनाचे मोठे केंद्र बनू शकते. शैक्षणिक क्षेत्राचा विस्तार झाल्यास आगामी काळातील औद्योगिक आणि सेवा क्षेत्रासाठी लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ येथेच उपलब्ध होईल, ज्यामुळे जिल्ह्याचे अर्थचक्र अधिक वेगाने फिरेल.
यावेळी ‘कोल्हापूर फर्स्ट’चे चेअरमन सुरेंद्र जैन, आमदार अशोकराव माने, व्हा. चेअरमन अॅड. सर्जेराव खोत, डॉ. अमोल कोडोलीकर, प्रताप पाटील, सचिव बाबासो कोंडेकर, सहसचिव उज्ज्वल नागेशकर, सहसचिव जयदीप पाटील, पद्मसिंह पाटील, बाळ पाटणकर, कमलाकांत कुलकर्णी, मोहन कुशीरे, हरिश्चंद्र धोत्रे, डॉ. संतोष प्रभू, नितीन वाडीकर, डॉ. विजय गावडे, श्रीकांत दूधाणे, बळीराम वराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूरसारखी उद्यमी मानसिकता सिंधुदुर्गातही व्हावी
या कार्यक्रमात बोलताना प्रभू यांनी एक मिश्किल टिप्पणीही केली. ते म्हणाले, बँकेच्या कारभारातून मला कोल्हापूरच्या औद्योगिक आणि कृषी विकासाची माहिती मिळाली. कोल्हापूरसारखी उद्यमी मानसिकता सिंधुदुर्गातही निर्माण व्हावी, असे आम्हाला वाटायचे. दोन्ही जिल्हे शेजारी असूनही मानसिकतेत इतका फरक का, असा प्रश्न पडायचा. कदाचित मध्ये सह्याद्री असल्यामुळे कोल्हापूरचे प्रगत विचार पलीकडे जात नसावेत, पण कोल्हापूरचे लोक अत्यंत कष्टाळू आणि उद्यमी आहेत यात वादच नाही.