आशिष शिंदे
कोल्हापूर : घशात खवखव होणे, आवाज बसणे किंवा स्वरयंत्रातील गाठी यांसारख्या आजारांचे निदान करण्यासाठी जरगनगर, कोल्हापूर येथील प्रथमेश पाटील या संशोधकाने एआय प्रणाली विकसित केली आहे. यामुळे रुग्णांची त्रासदायक तपासण्यांमधून सुटका होणार असून केवळ आवाजाच्या नमुन्यावरून घशातील गंभीर आजारांची पूर्वसूचना मिळणार आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ही नवी प्रणाली स्वरयंत्राला इजा झाल्यामुळे होणारे, तसेच मानवी कानांना न ऐकू येणारे सूक्ष्म बदल 97 टक्के अचूकतेने पकडते. येणार्या काळात वैद्यकीय क्षेत्रात क्लिनिकल व्हॉईस असेसमेंटसाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे. मानवाच्या आवाजाचे हळुवार (ब—ेथी), सामान्य (न्यूट्रल) आणि ताणलेला (प्रेस्ड) असे प्रकार असतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या स्वरयंत्रात (व्होकल कॉर्डस्) बिघाड होतो, गाठी येतात किंवा अर्धांगवायूचा झटका बसतो, तेव्हा नकळतपणे आवाजाचा प्रकार बदलतो. हे बदल मानवी कानांना ऐकू येत नाहीत; पण या नवीन एआय मॉडेलला ते 88 ते 97 टक्के अचूकतेने पकडता येतात.
एआय मॉडेल्सच्या अल्गोरिदममध्ये बदल करून आजाराचे निदान करण्याची ही नवीन प्रणाली रायचूर (कर्नाटक) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये बी.टेक. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेला प्रथमेश प. पाटील या कोल्हापूरच्या विद्यार्थ्याने विकसित केली आहे. प्रथमेश हा महापालिकेच्या जरगनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरचा माजी विद्यार्थी आहे. प्रथमेश याला ही नवी एआय प्रणाली विकसित करण्यासाठी किरण रेड्डी व पावो अल्कू यांचे मार्गदर्शन लाभले.
आजारांची मिळेल पूर्वकल्पना
सध्या घशाच्या आतील तपासणीसाठी अनेकदा घशात कॅमेरा घालून लॅरिंगोस्कोपी करावी लागते, जी रुग्णासाठी त्रासदायक असते. मात्र, या नवीन तंत्रज्ञानामुळे लवकर निदान, गाठी किंवा पॉलिप्स वाढण्याआधीच आवाजातील ताण (प्रेस्ड व्हॉईस) ओळखून उपचार सुरू करता येतील. यामध्ये रुग्णाला फक्त माईकसमोर बोलावे लागेल किंवा ‘आ’ करावा लागेल. त्यावरून सॉफ्टवेअर सांगेल की, स्वरयंत्राची स्थिती कशी आहे. ज्यांचा आवाज गायनामुळे किंवा इतर कारणांमुळे खराब होतो, त्यांना वेळीच सावध करता येईल.
हे तंत्रज्ञान केवळ गाण्यासाठी नसून, क्लिनिकल व्हॉईस असेसमेंट म्हणजेच वैद्यकीय तपासणीसाठी अत्यंत मोलाचे ठरेल. आवाजावर येणारा अतिताण हे अनेक आजारांचे मूळ असते आणि तेच नेमके हे एआय मॉडेल शोधून काढते. याचा उपयोग डॉक्टर आवाजाच्या समस्या लवकर ओळखण्यासाठी, थेरपीपूर्वी आणि थेरपीनंतर सुधारणा मोजण्यासाठी तसेच न्यूरोलॉजिकल आजार ओळखण्यासाठी देखील करू शकतात.प्रथमेश पाटील, मुख्य संशोधक