मुदाळतिट्टा , पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापुर ता. भुदरगड येथील सद्गुरु संत बाळूमामा यांचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. पालकमंत्री प्रकाश आबीटकर प्रमुख उपस्थित होते.
सरवडे ता. राधानगरी येथील आभार यात्रेसाठी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे आले होते यावेळी त्यांनी आदमापुर येथील बाळूमामा मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. समाधीस्थळी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. समाधीस पुष्पहार अर्पण केला. देवालय समितीच्या वतीने अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले, कार्याध्यक्ष रागिनी खडके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
बाळूमामांचा भाविक वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. या तीर्थस्थळाची महती जगभर पोचली आहे. एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानकडे पाहिले जात आहे. येथे भाविकांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असे त्यांनी यावेळी धैर्यशील भोसले यांच्याशी बोलताना सांगितले. बाळूमामाच्या समाधीचा महिमा त्यांनी ऐकून घेतला. या स्थळाचा विकास व्हावा यासाठी जो विकास कृती आराखडा तयार केला आहे तो जाणून घेऊन कार्यवाहीसाठी सुचित केला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालकमंत्री नामदार प्रकाश आबीटकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने, सत्यजित कदम, प्रांताधिकारी हरेश सूळ, तहसीलदार अर्चना पाटील गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, बाळूमामा देवालय समितीचे ट्रस्टी सचिव संदीप मगदूम, दत्तात्रय पाटील दिनकरराव कांबळे लक्ष्मण होडगे, विजयराव गुरव, संभाजी पाटील, दिलीप पाटील इंद्रजीत खर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.