Gokul Dairy | गोकुळच्या राजकारणात उपमुख्यमंत्र्यांचीही एन्ट्री Pudhari File Photo
कोल्हापूर

Gokul Dairy | गोकुळच्या राजकारणात उपमुख्यमंत्र्यांचीही एन्ट्री

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गोकुळमध्ये महायुतीतच सुरू असलेल्या वर्चस्ववादाच्या राजकारणात आता शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एन्ट्री होणार आहे. गोकुळमधील महायुतीचे नेते, संचालक यांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्यचे नेते, संचालक सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत होणारी त्यांची ही बैठक गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण ठरणार आहे.

गोकुळच्या संचालक मंडळाची 14 मे ला मुदत संपणार आहे. त्यामुळे गोकुळची निवडणुक प्रक्रिया सुरू झाली; मात्र गोकुळमधील वर्चस्ववादातून विशेषत: राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सुरू झालेल्या शह-काटशाहच्या राजकारणामुळे गोकुळची निवडणूक प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात सापडली. यामधून भाजप- राष्ट्रवादीमधील संघर्ष अधिकच तीव— झाला. महायुतीमधीलच दोन घटक पक्षांचा वाद मुख्यमंत्र्यांपर्यंतही पोहोचला. मंत्री हसन मुश्रीफ, आमदार शिवाजी पाटील यांनी त्यांच्या पातळीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांची बाजू मांडली. या सर्व वादापासून शिवसेना आणि जनसुराज्य हे पक्ष मात्र लांबच होते. त्यामुळे महायुतीमधील हा वाद मिटविण्यासाठी शिवसेना, जनसुराज्यचे नेते पुढाकार घेणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.

महायुतीचे नेते आणि गोकुळचे काही प्रमुख संचालक यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे समजते. यावेळी त्यांनी गोकुळच्या निवडणुकीत महायुतीमध्येच सुरू असलेल्या राजकारणाची माहिती दिली. प्रशासक नियुक्तीबाबतही चर्चा झाल्याचे समजते. संपूर्ण चर्चेनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गोकुळचे नेते, संचालक यांना सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊया, असे सांगितले. त्यामुळे सोमवारी गोकुळसंदर्भात होणार्‍या या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

भाजप नेते, संचालकांचा समावेश नाही

मुख्यमंत्र्यांच्या भेटीबाबत मिळालेल्या माहितीमध्ये सोमवारी होणार्‍या बैठकीमध्ये जिल्ह्यातील भाजप नेते अथवा गोकुळमधील भाजपचे संचालक यांचा बैठकीमध्ये समावेश दिसून येत नाही. त्यामुळे या भेटीमध्ये भाजपचा समावेश नसल्याने मुख्यमंत्री काय भूमिका घेणार, याकडेही लक्ष असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT