कोल्हापूर : कोल्हापूर दौर्यावर गुरुवारी (दि. 27) आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यावर खराब वाहनांच्या मुद्द्यावरून चांगलेच भडकले. ‘गाड्या घ्या ना... कलेक्टर!’ असे म्हणून उपमुख्यमंत्री पवार यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच प्रशासनातील दिरंगाईविषयी तीव्र नाराजीही व्यक्त करून अधिकार्यांना धारेवर धरले.
उपमुख्यमंत्री पवार कोल्हापूर दौर्यावर असताना विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यावेळी दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री पवार यांनाच फिरण्यासाठी जुनाट आणि खराब वाहनाचा फटका बसला. त्यामुळे त्यांनी शासकीय यंत्रणेकडील जुन्या आणि खराब झालेल्या वाहनांचा विषय उचलून धरला. अधिकार्यांनी या वाहनांमुळे होणार्या अडचणींचा उल्लेख केला असता उपमुख्यमंत्री पवार यांनी संताप व्यक्त करत तातडीने नवीन वाहने घेण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी येडगे यांनी पाच गाड्या असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रोटोकॉलसाठी गाड्या पाठविल्याचे सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी ‘कुणाकडे पाठविल्या गाड्या?’ अशी विचारणा जिल्हाधिकारी येडगे यांना केली. तसेच आताच्या आत्ता प्रस्ताव द्या, दोन गाड्यांची लगेच ऑर्डर देतो, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकारी येडगे यांना उद्देशून स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘सरकारकडे पुरेसा निधी आहे. जर गाड्या जुन्या झाल्या असतील आणि त्यांचा उपयोग होत नसेल, तर नवीन गाड्या घ्या. जनता आणि अधिकार्यांची गैरसोय होऊ नये.’
अजित पवार हे स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. याआधीही त्यांनी विविध बैठकीत अधिकार्यांना वेळेवर निर्णय न घेतल्याबद्दल फटकारले आहे. सरकारी विभागांनी कार्यक्षमतेने काम करावे आणि अनावश्यक विलंब टाळावा, असा त्यांचा नेहमीच आग्रह असतो.
गाड्यांसारख्या मूलभूत सुविधा सक्षम असणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करताना उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सुस्त कारभार सोडून जलदगतीने निर्णय घेण्यास सांगितले. यामुळे सरकारी कामकाज अधिक गतिमान होईल आणि नागरिकांना दर्जेदार सेवा मिळेल, असे ते म्हणाले.