कोल्हापूर : जिल्हा न्याय संकुल आवारात महिला वकिलास झालेल्या मारहाणीवर कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या विशेष सभेत सोमवारी तीव— पडसाद उमटले. पोलिसांच्या डोळ्यादेखत मारहाणीचा प्रकार होऊनही संशयित महिलेविरुद्ध कठोर कारवाई न करता पाठीशी घालण्याच्या भूमिका घेतल्याप्रकरणी शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठविण्यात आली. प्रिया पाटील व डोके यांना निलंबित करून त्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. व्ही. आर. पाटील, विवेक घाटगे, ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे, रणजित गावडे, तृप्ती पाटील, मनीषा सातपुते, प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांची भेट घेऊन शहर उपअधीक्षक प्रिया पाटील, निरीक्षक संतोष डोके यांच्या निलंबनाची मागणी केली. वकिलांच्या संतप्त भावनांची दखल न घेतल्यास बार असोसिएशनमार्फत तीव— आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या पार्श्वभूमीवर बार असोसिएशनच्या वतीने सोमवारी सकाळी न्यायसंकुलातील राजर्षी शाहू सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. व्ही. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेसाठी वकिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी झालेल्या चर्चेत अॅड. प्राजल शेळके, विद्या देशमुख, स्वाती तानुगडे, अश्विनी भोसले, शिल्पा सुतार, मनीषा सातपुते, अजित मोहिते, विवेक घाटगे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठविली. यावेळी संतप्त वकिलांनी न्यायसंकुल आवारात जोरदार निदर्शने केली. महिला वकिलांना मारहाण करणार्या प्रवृत्तीला पाठीशी घालणार्या यंत्रणेचा संतप्त वकिलांनी निषेध केला.
...म्हणून पोलिसांच्या भूमिकेवर आक्षेप
जिल्हा न्यायसंकुल आवारात शनिवारी सायंकाळी पन्हाळा तालुक्यातील एका महिला पक्षकाराने महिला वकिलास मारहाण केली. जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने संशयित महिलेवर गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवरव वकिलांनी आक्षेप घेत पक्षपातीचा आरोप केला.