सुनील कदम
कोल्हापूर : सह्याद्रीतील पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्र घटविण्याची मागणी महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी केली आहे. मात्र, तसे केल्यास सह्याद्रीचे पर्यावरण तर धाेक्यात येईलच; पण दक्षिण भारतातील पर्जन्यमानावरही विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे.
सह्याद्रीचे एकूण क्षेत्रफळ १ लाख ६० हजार चौरस किलोमीटर आहे. केंद्र शासनाने सातव्या अधिसूचनेद्वारे त्यापैकी ५६ हजार ८२५ चौ. कि. मी. क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १७ हजार ३४० चौ. कि. मी. क्षेत्र आणि २,५१५ गावांचा समावेश आहे. कर्नाटकातील २०,६६८ चौ. कि.मी., गाेव्याचे १,४६१ चौ. कि. मी., तामिळनाडूचे ६,९१४ चौ. कि. मी. आणि केरळचे १३,१०८ चौ. कि. मी. क्षेत्र येते. मात्र, बहुतांश राज्यांनी आपले संरक्षित क्षेत्र कमी करण्याची मागणी केली आहे.
राज्यांची मागणी!
केरळचे संरक्षित क्षेत्र पूर्वी १३ हजार १०८ चा. कि. मी. होते, ते केरळच्या मागणीनुसार ३,११५ चौ. कि. मी. कमी करून ९,९३७ चौ. कि. मी. करण्यात आलेले आहे. त्यातील आणखी काही क्षेत्र कमी करण्याची केरळची मागणी आहे. महाराष्ट्र शासनाने आपल्या हद्दीतील १,९८१ चौ. कि. मी. क्षेत्र कमी करून संरक्षित क्षेत्रातील ३८८ गावांना या यादीतून वगळण्याची मागणी केली आहे. गोवा सरकारने जवळपास निम्मे संरक्षित क्षेत्र आणि ४५ गावे या यादीतून वगळण्याची मागणी केली आहे. वेगवेगळी विकासकामे व औद्योगिक विकासासाठी हे क्षेत्र वगळण्याची त्या त्या राज्यांची केंद्राकडे मागणी आहे.
पर्जन्यमानावर परिणाम!
सह्याद्री पर्वत व त्यावरील जंगले यामुळेच या भागात सरासरी ४ ते ५ हजार मिलिमीटर पाऊस कोसळतो, ७ राज्यांची तहान भागते. या राज्यातील सिंचन, जलविद्युत प्रकल्प, औद्योगिक विकासासाठी लागणारे बहुतांश पाणी इथूनच उपलब्ध होते. उद्या या भागातील जंगले कमी होत गेली तर साहजिकच पावसाचे प्रमाणही कमी कमी होत जाणार आहे. भविष्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही राज्याला ही बाब न परवडणारी आहे. त्यामुळे केवळ आजचा औद्योगिक विकास डोळ्यापुढे न ठेवता भविष्यातील पर्यावरणीय आणि पर्जन्यमानविषयक आडाखे विचारात घेऊन या बाबतीत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा औद्योगिक विकास तर होत राहील; पण पर्यावरणाचा ऱ्हास होईल.
३५ टक्क्यांनी घटले जंगल
सह्याद्रीचे एकूण क्षेत्रफळ १,६०,००० हजार चौरस किलोमीटर
पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्र ५६,८२५ चौरस कि. मी.
महाराष्ट्रातील क्षेत्र १७,३४० चौ. कि. मी. आणि २,५१५ गावे
सह्याद्री डोंगररांगांमध्ये असलेला भूभाग (पूर्वी) ७० टक्के
सह्याद्री डोंगररांगांमध्ये सध्याचा भूभाग केवळ ३५ टक्के
आणखी क्षेत्र वगळल्यास २५ टक्क्यांच्या आसपास सीमित होणार