कोल्हापूर : गर्भलिंग निदानाच्या गुन्ह्यांतील आरोपींचा तपास आणि व शिक्षेची प्रक्रिया याचा जलदगतीने निकाल लागण्यासाठी स्वतंत्र विशेष न्यायालय स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे विधान परिषदेच्या माजी उपसभापती, आमदार नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. तसेच वारंवार गर्भलिंग तपासणीच्या गुन्ह्यात आढळणाऱ्या डॉक्टरांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिस प्रशासनाला दिल्याचीही माहिती दिली. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
गोऱ्हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपाताच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य अधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांची बैठक घेतली. यावेळी गर्भलिंग निदानाच्या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेपासून आरोपपत्र दाखल करण्यापर्यंतच्या कारवाईचा त्यांनी आढावा घेतला. फरार आरोपींचा शोध आणि प्रलंबित तपास जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.