कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि वाढत्या प्रवासीसंख्येला न्याय देण्यासाठी दिल्लीसह शिर्डी, नागपूर, विशाखापट्टणम, चेन्नई आणि इंदूर या शहरांना थेट विमानसेवा सुरू करण्याची जोरदार मागणी विमानतळ सल्लागार समितीने केली आहे. आगामी वर्षात या नव्या मार्गांची अंमलबजावणी व्हावी, असा ठाम आग्रह बैठकीत धरण्यात आला.
न्यू पॅलेस येथे समितीचे अध्यक्ष खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, प्रांताधिकारी मोसमी चौगुले आदींसह सदस्य उपस्थित होते.
एअरबस सेवा आणि विस्तारित धावपट्टीला प्राधान्य
औद्योगिक, पर्यटन आणि शैक्षणिकवाढीच्या पार्श्वभूमीवर एअरबससारख्या मोठ्या क्षमतेच्या विमानांची सेवा सुरू करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. त्यासाठी आवश्यक ट्रायल लँडिंग तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक भूसंपादन पूर्ण झाले असून, प्रत्यक्ष कामे युद्धपातळीवर हाती घेण्याची सूचना देण्यात आली.
प्रवाशांसाठी परवडणारे दर व दर्जेदार सुविधा
वाढत्या प्रवासीसंख्येच्या पार्श्वभूमीवर तिकीट दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील, असे ठेवण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच विमानतळावर दर्जेदार टॅक्सी सेवा, स्वच्छ व सुसज्ज अल्पोपाहार केंद्रे, पर्यटकांसाठी माहिती व मार्गदर्शन केंद्र यासह सर्व सेवा उपलब्ध करण्याचे ठरले.
कार्गो सेवेचा विस्तार
सध्या सुरू असलेल्या चांदी व औद्योगिक साहित्य वाहतुकीसोबत स्थानिक फुले, फळे आणि भाजीपाला कार्गो सेवेचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. विमानतळालगतच्या गावांतून कचरा जाळण्यास बंदी आणि 20 कि.मी. परिसरातील उंच बांधकामांसाठी आवश्यक परवानगी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.