कोल्हापूर ः अलमट्टी धरणातील पाण्याची फूग वाढल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील नागरिकांना महापुराचा फटका बसतो. जुजबी आकडेवारीचा खेळ करून कर्नाटक, महाराष्ट्र सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. त्यामुळे अलमट्टीच्या उंचीबाबत केंद्रीय जलसंधारणमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन समन्वयाने निर्णय घ्या, अशी मागणी करण्यात आली. उंची वाढविरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. यावेळी आता महापुराचे पाणी नाका-तोंडात चालले आहे, असा आरोप करत पाटबंधारे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना धारेवर धरले. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील शेतकरी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी खासदार शाहू महाराज म्हणाले, अलमट्टीसंदर्भातील प्रश्न कायमचा सोडवायचा आहे. जनतेच्या प्रश्नांकडे सरकारला लक्ष द्यावेच लागेल. जनता आणि सरकारची समन्वय समिती झाली पाहिजे. त्यातून हा प्रश्न सुटेल. माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, महापुराला अलमट्टीबरोबरच विविध पुलांचे भराव कारणीभूत आहेत. पूर लवकर ओसरत नाही. पाणी विसर्जनाची गती मंदावते. त्यासाठी कृती आराखाडा तयार करणे महत्त्वाचे आहे. शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, अलमट्टीप्रश्नी पाटबंधारे विभाग अपयशी ठरल्याचे मान्य करावे. या प्रश्नाबाबत सर्वपक्षीयांना घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येईल.
सांगली पाटबंधारेचे अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी हिप्परगी व अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्याबाबत माहिती सांगितली. तीन शिफ्टमध्ये आठ अधिकारी 24 तास कार्यरत आहेत. अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी धरणातून सोडल्या जाणार्या विसर्गाचे चित्रफितीद्वारे सादरीकरण केले. यावेळी कार्यकारी अभियंता अस्मिता माने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. अंकुश संघटनेचे धनंजय चुडमुंगे, विक्रांत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, सर्जेराव पाटील, बाबासाहेब देवकर, बाजार समितीचे संचालक भरत पाटील, कॉ. दिलीप पोवार, अनिल घाटगे, सुभाष देसाई, कॉ. चंद्रकांत यादव आदींसह शेतकर्यांनी मते मांडली. दलितमित्र व्यंकप्पा भोसले, रुपेश पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.