Sahyadri Tiger Reserve News | ‘सह्याद्री’तील व्याघ्र पुनर्वसन रखडणार? 
कोल्हापूर

Sahyadri Tiger Reserve News | ‘सह्याद्री’तील व्याघ्र पुनर्वसन रखडणार?

‘चंदा’ आणि ‘चांदणी’ वाघिणींच्या स्थलांतराला स्थानिकांचा विरोध; वन विभागाची मात्र तयारी

पुढारी वृत्तसेवा

सुनील कदम

कोल्हापूर : ताडोबा-अंधारी येथील ‘चंदा’ आणि ‘चांदणी’ या दोन वाघिणींच्या स्थलांतराला काही स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे ‘सह्याद्री’तील व्याघ्र पुनर्वसन प्रक्रिया आणखी काही काळ रखडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वाघांच्या अधिवासासाठी योग्य असल्यामुळे पूर्वी या भागात मोठ्या प्रमाणात वाघ होते; पण अलीकडील काही वर्षांत विविध कारणांमुळे इथे वाघांचा कायमस्वरूपी अधिवास आढळून येत नव्हता. 2022 साली झालेल्या राष्ट्रीय व्याघ्र गणनेनुसार, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एकही वाघ आढळून आला नव्हता. त्यामुळे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने राज्याच्या अन्य व्याघ्र प्रकल्पातील वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान विभागानेही या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. त्यानुसार ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून तीन वाघ आणि पाच वाघिणींचे स्थलांतर करून त्यांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहे. राज्यातील वन विभागाने या योजनेवर कामही सुरू केले आहे. येत्या काही दिवसांत ही स्थलांतराची प्रक्रिया सुरू होणार होती; मात्र त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या असल्याचे समजते.

स्थानिकांचा विरोध!

पहिल्या टप्प्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ‘चंदा’ आणि ‘चांदणी’ या नावाच्या दोन वाघिणी इथे आणण्यात येणार आहेत. मात्र, त्या भागातील काही स्थानिक पर्यटक आणि वन्यप्राणी तज्ज्ञांनी या दोन वाघिणींच्या स्थलांतराला विरोध केलेला आहे. त्यांच्या मतानुसार, या दोन वाघिणी सध्या गर्भावस्थेत असून, तशा अवस्थेत त्यांचे स्थलांतर धोकादायक ठरू शकते. त्यामुळे त्यांनी या स्थलांतराला विरोध केल्याचे समजते.

‘चंदा’, ‘चांदणी’च्या गर्भावस्थेमुळे पुढची प्रक्रियाही लांबणार!

‘चंदा’ आणि ‘चांदणी’ या दोन वाघिणींच्या गर्भावस्थेमुळे आणि त्यांनी छाव्यांना जन्म दिल्यानंतर छाव्यांच्या संगोपनाच्या कारणावरून त्यांचे स्थलांतर बराच काळ लांबण्याची शक्यता आहे. ‘चंदा’ आणि ‘चांदणी’ या दोन वाघिणींचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतर केल्यानंतर, त्यांचे इथे यथायोग्य पुनर्वसन केल्यानंतर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वाघिणी इथे कायमस्वरूपी स्थिरस्थावर झाल्यानंतरच अन्य तीन वाघिणी आणि तीन वाघांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘चंदा’ आणि ‘चांदणी’च्या स्थलांतर आणि पुनर्वसनावरच अन्य वाघ-वाघिणींचे स्थलांतर आणि पुनर्वसन अवलंबून आहे. त्यामुळे तर ही प्रक्रिया आणखी काही काळ रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची पार्श्वभूमी!

केंद्र शासनाने 5 जानेवारी 2010 रोजी केला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प घोषित.

सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाचा विस्तार.

1,165.57 चौरस किलोमीटर प्रकल्पाचे क्षेत्रफळ.

600 चौरस कि.मी. कोअर झोन (गाभा क्षेत्र)

तर 565 चौरस कि.मी. बफर झोन (राखीव क्षेत्र).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT