Decrease in water level of river Panchganga
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने मंगळवारी पंचगंगेचे पाणी पात्रात गेले.  Pudhari File Photo
कोल्हापूर

जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; पंचगंगा पात्रात

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात सर्वदूर कोसळणार्‍या पावसाने मंगळवारी उसंत घेतली होती. शहरासह जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होऊन पंचगंगा दुपारी पात्रात गेली. गेल्या 24 तासांत केवळ चंदगड तालुक्यात 10.2 मि.मी. पाऊस झाला आहे. पाण्याखाली गेलेले 22 बंधारे खुले झाले. सध्या राधानगरी धरणातून 1,300 क्युसेक विसर्ग सुरू आहे. हवामान खात्याने गुरुवारी (दि. 11) कोल्हापूरला पावसाचा यलो अलर्ट, तर शुक्रवारी (दि. 12) व शनिवारी (दि. 13) ऑरेंज अलर्ट दिला आहे.

  • एका दिवसात 3.9 फुटांनी घटली पाणी पातळी

  • 22 बंधारे खुले; 28 बंधारे पाण्याखाली

  • पंचगंगा 29.05 फुटांवर

पावसाने उसंत घेतल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत घट

शहरात सोमवारनंतर मंगळवारी पावसाने उसंत घेतली होती. दिवसभर अधूनमधून तुरळक सरी कोसळल्या. असेच चित्र जिल्ह्यातही पाहायला मिळाले. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात तुरळक पावसाची नोंद झाली आहे. पावसाने उसंत घेतल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होत आहे. सोमवारी रात्री 33 फूट 8 इंचांवर असणार्‍या पंचगंगेच्या पाणीपातळीत मंगळवारी 3 फूट 9 इंचांची घट होऊन रात्री 9 वाजता पाणीपातळी 29 फूट 1 इंचावर पोहोचली होती. पाणीपातळी घटल्याने सोमवारी पाण्याखाली असणार्‍या 50 बंधार्‍यांपैकी 22 बंधारे खुले झाले असून, 28 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत गगनबावडा तालुक्यात 6.2 मि. मी. पावसाची नोंद झाली. राधानगरी 4.8, भुदरगड 4.3, शाहूवाडी 1.5, करवीर 1, कागल 0.9, आजरा 0.8, गडहिंग्लजमध्ये 0.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. राधानगरी धरणात 3.97 टीएमसी पाणीसाठा असून, धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणातील पाणीसाठा

तुळशी 1.75 टीएमसी, वारणा 17.29 टीएमसी, दूधगंगा 8.66 टीएमसी, कासारी 1.25 टीएमसी, कडवी 1.69 टीएमसी, कुंभी 1.14 टीएमसी, पाटगाव 2.37 टीएमसी, चिकोत्रा 0.52 टीएमसी, चित्री 1.06 टीएमसी, जंगमहट्टी 0.97 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.00 टीएमसी, सर्फनाला 0.27 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

SCROLL FOR NEXT