कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
त्यांचे पती बँकेत उच्चपदस्थ अधिकारी... लग्नाला १४ वर्षे झाली, तरी मूलबाळ नव्हते... त्यामुळे आयव्हीएफ तंत्रज्ञान उपचाराने त्यांना मातृत्वाचे सुख लाभणार होते. त्या पाच महिन्यांच्या गरोदर होत्या; पण डेंग्यूची दृष्ट लागली आणि राजेंद्रनगरात राहणाऱ्या ऋतुजा दिनेश गावकर (वय ३७) यांचा पोटातील दोन बाळांसह मृत्यू झाला. (Kolhapur News)
ऋतुजा यांच्या मृत्यूने गावकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ऋतुजा याचे पती दिनेश गावकर रत्नाकर बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक आहेत. लग्नानंतर त्यांना अनेक वर्षे मूलबाळ नव्हते. आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या साह्याने त्या गरोदर राहिल्या. त्यांच्यासह पोटातील दोन बाळांचीही तब्येत चांगली होती. मात्र, आठवड्यापूर्वी त्यांना तीव्र ताप आला होता. सोमवारी (दि. २६) त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय तपासणीत त्यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. प्रकृती खालावत गेली. प्लेटलेटस् कमी झाल्या. ऋतुजा यांचा जीव वाचविण्यासाठी गर्भपाताचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतरही नियतीने डाव साधला. शुक्रवारी (दि. ३०) ऋतुजा यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती, आई, भाऊ असा परिवार आहे.