कोल्हापूर : साऊंड सिस्टीमच्या कर्णकर्कश दणदणाटाने ध्वनिप्रदूषणाचे सारे नियम अक्षरशः धाब्यावर बसवले. साऊंड सिस्टीमच्या दणदणाटामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची अक्षरशः ऐशी की तैशी झाल्याचे शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या मोजमापातून समोर आले आहे. अनंत चतुर्दशीला मिरवणूक मार्गावरील १५ ठिकाणी केलेल्या ध्वनिमापनात दिवसा महाद्वार रोडवर तब्बल १०१.३ डेसिबल तर, रात्री पापाची तिकटी येथे तब्बल १०१.९ डेसिबल आवाजाची नोंद झाली. एवढ्या तीव्र आवाजाचा कानांवर परिणाम होऊ शकतो.
महाद्वार रोड, पापाची तिकटी येथे सर्वाधिक आवाज
अनेक ठिकाणी आवाज ७० ते ९० डेसिबलच्या पुढे
पारंपरिक वाद्यांपेक्षा ध्वनिवर्धकांचा आवाज अधिक
शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने अनंत चतुर्दशीदिवशी विसर्जन मार्गावरील १५ ठिकाणी आवाजाच्या तीव्रतेचे मोजमापन केले. यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ध्वनिप्रदूषणाची तीव्रता स्पष्टपणे जाणवली. रात्री विसर्जन मिरवणुकीत साऊंड सिस्टीमचा दणदणाट किती तीव्र होता, याची कल्पना पापाची तिकटी येथे नोंदलेल्या १०१.९ डेसिबल आवाजावरून येते. निर्धारित मर्यादा दिवसा ६५ आणि रात्री ५५ डेसिबल आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या १५ पैकी कोणत्याही ठिकाणी ध्वनी पातळी निर्धारित ५५ डेसिबलच्या मर्यादेत राहिली नाही.
सायलंट झोनमध्येही ध्वनिप्रदूषणाची स्थिती गंभीर राहिल्याचे मोजमापातून स्पष्ट होते. केवळ शिवाजी विद्यापीठ परिसरातच दिवसा ४८.२ आणि रात्री ३९.१ डेसिबल अशी मर्यादेत ध्वनी पातळी राहिली. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने केलेल्या निरीक्षण पथकात विभागप्रमुख डॉ. ए. एस. जाधव, डॉ. पी. डी. राऊत, अमित आर. माने, इंद्रजित पी. शेनोळिकर, श्रुतिका वाय. चौधरी यांचा समावेश होता.