कोल्हापूर : कोल्हापूर ते गांधीनगर रोडवरील तावडे हॉटेल परिसरातील आरक्षित जागेवरील अतिक्रमणे पाडण्यासाठी महापालिकेने बजावलेल्या अंतिम नोटिसांची मुदत शनिवारी (दि. २०) संपली. त्यामुळे कारवाई होणार कधी, असा प्रश्न आहे. महापालिका प्रशासन सोमवारी त्या अतिक्रमणावर बुलडोझर फिरवणार का? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
तावडे हॉटेल परिसरातील उचगाव ग्रामपंचायतीने दावा केलेली जागा महापालिकेची असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने २२ एप्रिल रोजी दिला आहे. संबंधित बांधकामे पाडण्यासाठी महापालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. काही अतिक्रमणधारकांनी सर्किट बेंचमध्ये त्या नोटिसांना आव्हान दिले होते. ७ मे रोजी न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्यानंतर महापालिकेने कारवाई सुरू करून १ जून रोजी अंतिम नोटिसा बजावल्या आहेत. त्या नोटिसांवर ११६ मिळकतधारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरील अंतिम सुनावणी २५ जून रोजी होणार असून तोपर्यंत महापालिकेने कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र उर्वरित मिळकतींबाबत आदेश नाहीत.