रंकाळ्यात आढळले मृत कासव Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur | रंकाळ्यात आढळले मृत कासव

प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; जलचरांचे अस्तित्व धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

फुलेवाडी : ऐतिहासिक रंकाळा तलावात सोमवारी सकाळी रंकाळा टॉवर परिसरात तब्बल तीन फूट लांबीचे कासव मृतावस्थेत आढळून आले. यामुळे जलचरसृष्टी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी शेकडो मासे मृत आढळल्याची घटना ताजी असतानाच मृत कासव आढळून आले आहे. रंकाळ्यात आढळलेले हे कासव आजवरच्या कासवांमध्ये सर्वात मोठे असल्याचे सांगितले जाते.

रंकाळाप्रेमींनी हे कासव बाहेर काढले. त्याचा मृत्यू कशामुळे झाला, हे कळण्यासाठी महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे यांनी वन विभागाचे अधिकारी नंदकुमार नलवडे यांच्याशी संपर्क साधून ते त्यांच्याकडे सुपूर्द केले. वन विभागाचे डॉ. लू ब्रीक यांनी तपासणी केली असता, या कासवाचा मृत्यू चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असून, शरीर पाण्यामुळे कुजल्याचे सांगितले. इतक्या मोठ्या आकाराची कासवे सहसा समुद्रात आढळतात. या कासवाचा मृत्यू वृद्धापकाळाने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, चारही बाजूंनी मिसळणारे सांडपाणी आणि कचर्‍यामुळे रंकाळ्याचे पाणी हिरवे जर्द झाले आहे. कासवाच्या मृत्यूचे कारण जरी वृद्धापकाळ सांगितले जात असले, तरी या घटनेमुळे रंकाळ्यातील प्रदूषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, जलचरांचे अस्तित्व धोक्यात आल्याची भीती व्यक्त होत आहे.

रंकाळ्यात सापडलेले कासव हे सॉफ्ट शेल टर्टल प्रजातीमधील असून, शेड्यूल-4 मधील असण्याची शक्यता आहे. हे कासव प्रामुख्याने कृष्णा, पंचगंगा यासह तलावात आढळते. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅक्टमधील संरक्षित प्रजाती आहे. कासवाचे वय साधारणपणे 50 ते 70 वर्षे असेल. रंकाळा तलाव जुना असून, या ठिकाणीच कासवाची वाढ झाल्याचे दिसून येते.
- डॉ. एस. एम.गायकवाड, प्राणिशास्त्रज्ञ, शिवाजी विद्यापीठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT