कोल्हापूर

kolhapur | शेणवडेत पोषण आहार पाकिटात आढळली मृत बेडकी

पालकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील शेणवडेपैकी चौगुलेवाडी येथे अंगणवाडीतून वितरित करण्यात आलेल्या पोषण आहाराच्या पाकिटात शुक्रवारी चक्क मेलेली बेडकी आढळून आली.

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चौगुलेवाडी येथील अंगणवाडीतून लाभार्थी माता आणि बालकांना पोषण आहाराच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी एक पाकीट शुक्रवारी (6 मार्च) घरी वापरण्यासाठी फोडले असता, त्यातील सुकडीच्या मिश्रणात मेलेली लहान बेडकी स्पष्टपणे दिसून आली. हे पाकीट सीलबंद असतानाच त्यात बेडकी कशी आली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

राज्यात एकाच ठेकेदाराकडून या आहाराचा पुरवठा केला जातो. गर्भवती माता आणि 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांसाठी हा आहार अत्यंत संवेदनशील मानला जातो. हे पाकीट न तपासता थेट शिजवून मुलाला दिले असते, तर त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता होती, असा संताप पालकांनी व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित बॅचचा सर्व आहार तातडीने तपासून तो नष्ट करावा आणि दोषी ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT