कोल्हापूर

कोल्हापूर : मृत मासे कुजले; रंकाळ्यावर दुर्गंधी

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : रंकाळ्यात मासे मृत होण्याची घटना तीन दिवसांपूर्वी उघडकीस आली. मासे कशाने मेले, याचा शोध तर बाजूलाच राहिला; पण मृत झालेले सर्व मासेही महापालिकेने काढलेले नाहीत. हे मासे आता कुजू लागले आहेत. त्यामुळे दुर्गंधी वाढत चालली आहे. हे मासे काढण्यासाठी महापालिकेला वेळ नाही का, असा संतप्त सवाल नागरिकांतून केला जात आहे.

कोल्हापूरचे वैभव असलेला रंकाळा अजूनही पूर्णपणे प्रदूषणमुक्त झाला नाही, हे पुन्हा उघड झाले आहे. रंकाळ्यातील मासे मृत झाल्याचे शुक्रवारी सकाळी समोर आले. यानंतर महापालिकेने मृत झालेले मासे काढण्यास सुरुवात केली. शुक्रवारी आणि शनिवारीही ही मोहीम राबविली. मात्र, महापालिकेने ही मोहीम यशस्वी राबविली की दिखावा केला, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे.

रंकाळ्यात विशेषत: संध्यामठ परिसरात मृत मासे मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यापैकी काही मासे कुजू लागले आहेत. यामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. वाढत्या दुर्गंधीने परिसरातील नागरिकांसह फिरण्यासाठी येणार्‍या पर्यटक, नागरिकांनाही नाकावर रूमाल धरण्याची वेळ आली आहे.

रविवार सुट्टी असल्याने संध्यामठजवळ पाणी पातळी घटल्याने मोकळ्या झालेल्या जागेवर नागरिकांची मोठी गर्दी होती. मात्र, या सर्वच नागरिकांना संध्यामठजवळ जाताना नाकावर रूमाल ठेवूनच जावे लागले. या मार्गावरच कुजलेल्या माशांचा खच पडला होता. त्यातूनच वाट काढत नागरिक ये-जा करत होते. काहींनी तर हे मृत मासे काढून या परिसरातील दगडावर ठेवले होते. यामुळे एरव्ही निवांतपणे बसून रंकाळ्यामागे आकाशात रंगांची उधळण करत मावळतीला जाणार्‍या सूर्याचा नजारा बघणार्‍यांना आज याचा आनंद फारसा घेता आला नाही.

संध्यामठजवळ मोठी गर्दी होत आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासे पडलेले दिसून येत आहेत. एक-दोन तास जरी या परिसरात कर्मचारी फिरले तरी हे सर्व मृत आणि कुजलेले मासे काढून टाकणे सहज शक्य आहे. मात्र, तितकी तसदी महापालिका का घेत नाही, असा सवालही यानिमित्त उपस्थित होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT