शिवराज सावंत
फुलेवाडी : ऐतिहासिक संध्यामठ परिसर ते तांबट कमान या परिसरात पाण्यात अनेक लहान-मोठे मासे मृत झाले आहेत. रंकाळ्यात मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असून, याचा फटका जलचरांना बसत आहे. महापालिका कायमस्वरूपी उपाय करणार की नाही, असा रंकाळाप्रेमींना प्रश्न पडला आहे.
रंकाळा तलावातील दूषित पाण्यामुळे यापूर्वीही अनेकवेळा मासे मोठ्या प्रमाणात मृत झाल्याचे प्रकार घडले आहेत. दोन दिवसांपासून खराडे कॉलेज, संध्यामठ ते तांबट कमान परिसरात पाण्यात लहान-मोठ्या मृत माशांचा खच पडल्याचे निदर्शनास येत आहेत. मृत मासे कुजल्यामुळे दुर्गंधी सगळीकडे पसरली आहे. यामुळे स्थानिक नागरिक व हजारो पर्यटकांना नाकाला रुमाल बांधून फिरण्याची वेळ आली आहे. श्याम सोसायटी, परताळा, शाहू उद्यान परिसर, या ठिकाणांहून सांडपाणी थेट रंकाळा तलावात मिसळते. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने मासे मरत आहेत. तलावातील पाण्याला पांढरा फेस येतो व पाणी हिरवेगार होत आहे.
महापालिका अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रत्येकवेळी पाण्याचे नमुने घेऊन जातात आणि त्याचे पुढे काय झाले, हे कोणालाच कळत नाही. तलावात मिसळणारे सांडपाणी बंद होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा अधिकारी, महापालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग यांनी एकत्र येऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.