शिरोली दुमाला : गावातील मुख्य रस्त्यावरील घराला कुलूप असल्याची संधी साधून भरदिवसा घरफोडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयित महिलेला ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत पकडले. ही घटना येथील मेन रोडवर गणपती कोंडी निकम यांच्या घरी दुपारच्या सुमारास घडली.
निकम यांच्या घराला कुलूप असल्याचे पाहून एक महिला घराच्या दरवाजाजवळ आली. तिच्या संशयास्पद हालचाली शेजारील महिलांच्या लक्षात आल्या. त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये कुजबुज सुरू झाली. दरम्यान, संबंधित महिलेने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटे उघडून चोरी करण्याचा तिचा प्रयत्न सुरू असतानाच बाहेर असलेल्या महिलांना संशय आल्याने त्यांनी मोठ्याने हाका मारून त्या महिलेला बाहेर येण्यास सांगितले.
त्यामुळे घाबरलेल्या महिलेने चोरीचा प्रयत्न अर्धवट सोडून घराच्या मागील बाजूने बेसमेंटकडे धाव घेतली. यावेळी घराबाहेर मेन रोडवर उभ्या असलेल्या महिलांनी व ग्रामस्थांनी तिला पकडले. घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील यांनी करवीर पोलिस ठाण्याला वर्दी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित महिलेला ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.