Dudhganga river pump sealing
दत्तवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीवरून सिंचनासाठी पाणी उपसा करणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाने वारंवार पाणीपट्टी भरण्याचे आवाहन केले होते. थकबाकीदारांना नोटिसा देऊन तसेच प्रत्यक्ष घरोघरी जाऊनही रक्कम भरण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने कोल्हापूर पाटबंधारे विभागांतर्गत कागल शाखेकडून दत्तवाड परिसरातील विद्युत उपसा यंत्रावर सील लावण्याची कारवाई करण्यात आली.
पाटबंधारे विभागाकडून प्रति हेक्टर १३४६ रुपयांच्या दराने पाणीपट्टी आकारली जाते. ही रक्कम तुलनेने कमी असतानाही शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे विभागाने स्पष्ट केले. वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दूधगंगा धरणापासून दत्तवाड व दानवाड ही गावे सुमारे ८५ ते ९० किलोमीटर अंतरावर असूनही वर्षभर सिंचन व पिण्यासाठी पुरेसा पाणीपुरवठा केला जातो. तरीही थकीत पाणीपट्टी न भरल्यामुळे विभागाने कठोर पाऊल उचलले आहे. दत्तवाड, दानवाड आणि घोसरवाड येथील थकबाकीदार शेतकऱ्यांनी तातडीने देय रक्कम भरून सहकार्य करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
ही कारवाई कार्यकारी अभियंता स्मिता माने, सहाय्यक अभियंता प्रशांत कांबळे आणि शाखाधिकारी राजेंद्र आरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी पाटबंधारे विभागाचे इतर कर्मचारीही उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा संताप वाढला
दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढत असताना पाण्याची गरज असताना अशी कारवाई केल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे. ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत ती त्वरित मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.