कोल्हापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमी अर्थात दसरा साजरा करण्यासाठी कोल्हापुरात तयारी पूर्ण झाली आहे. ऐतिहासिक दसरा चौकात होणार्या शाही दसर्यासाठी शामियाना उभारण्यात आला आहे.
दरम्यान, दसरा चौकात लकडकोट, ध्वज उभारणीचे काम पूर्ण करण्यात आले. तसेच सरदार, जहागीरदार, मानकरी यांच्यासाठी शामियाना उभारण्यात आला आहे. कोल्हापूर दसरा महोत्सव समिती, छत्रपती देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, महापालिका या प्रशासनाच्या वतीने बुधवारी दिवसभर तयारी करण्यात आली. दिवसभरात येणार्या पावसामुळे दसरा चौक मैदानात पाणी साठून राहिले होते. तसेच चिखल झालेल्या भागात खडी व मुरुम टाकण्यात आला. पावसाच्या पार्श्वभूमीवर शामियानावर पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे.
दसरा चौकात होणार्या दसरा सोहळ्यासाठी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानी व गुरू महाराज यांच्या पालखी रवाना होतात. सायंकाळी साडेपाच वाजता पारंपरिक लवाजम्यासह या पालखी मार्गस्थ होणार आहेत. अंबाबाई मंदिरातून अंबाबाईची पालखी तुळजा भवानी मंदिरात येईल. भाऊसिंगजी रोड मार्गे पालखी दसरा चौकातील ऐतिहासिक दसरा सोहळ्यास्थळी विराजमान होईल. शमीपूजन प्रसंगी या पालखींचेही पूजन करण्यात येणार आहे.
दसर्यानिमित्ताने शहरातील बाजारपेठही सजली आहे. बुधवारी झेंडूची फुले, तोरणे, माळा, आंब्याची पाने, शमीची पाने खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. दसर्यानिमित्त विविध वस्तू खरेदी केल्या जात असल्याने माहिती घेण्यासाठी बुधवारी रात्रीपर्यंत बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या.