कोल्हापूर : सध्या सर्वत्र साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ट्रॅक्टर-ट्रॉल्यांमधून धोकादायक आणि बेफिकिरीने होणारी वाहतूक नागरिकांच्या जीवावर उठली आहे. ऊस वाहतूक वाहनांच्या अपघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ट्रॅक्टर चालकांच्या अरेरावी आणि नियमबाह्य वाहतुकीचा फटका नागरिकांना बसत आहे.
हंगामाच्या प्रारंभीच दोन अपघातांत दोन व्यक्तीचा बळी गेल्याने धोकादायक ऊस वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनल्याचे समोर आले. ट्रॉल्यांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरणे, वळणांवर आयलँडला क्रॉस करण्याऐवजी विरुद्ध दिशेने वळण घेणे, दोरखंडाने ऊस घट्ट बांधला नसल्याने उसाच्या मोळ्या बाहेर पडून अपघाताचा धोका वाढतो. ग्रामीण भागात रस्त्यांच्या वळणांवर, घाट रस्त्यांवर आणि गावांमध्ये उसाची वाहने सुसाट असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन जागीच थांबावे लागते. ट्रॅक्टर चालक शाळा व हॉस्पिटल, बाजारपेठ परिसरात गांभीर्याने वाहन चालवित नसल्याने अपघाताचे प्रकार घडत आहेत. भरवस्तीपेक्षा रिंगरोड, अथवा रुंद रस्त्यांनी ऊस वाहतूक केल्यास अपघातांना आळा बसण्याची शक्यता असते.
शहरात दिवस-रात्र ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर-ट्रॉलींची मोठी वर्दळ दिसते. अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने समोरुन येणार्या वाहनधारकांचा गोंधळ होऊन अपघाताचा धोका वाढतो. ट्रॅक्टरचालक कर्णकर्कश आवाजात साऊंड सिस्टीम लावून सुसाट असल्याने पाठीमागून हॉर्न वाजविणार्या वाहनधारकास बाजू देण्याचे भान ट्रॅक्टर चालकांना राहत नाही. परिणामी, पाठीमागून येणारा वाहनधारक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी अपघात होण्याची शक्यता असते. जिल्ह्यात शिरोळ आणि रेंदाळ येथे उसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीस धडकून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन विभाग आणि शहर वाहतूक शाखा यांनी संयुक्त कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.
वाहतूक पोलिस आणि आरटीओचे दुर्लक्ष
ऊस वाहतूक करणार्या वाहनचालकांबाबतीत नियमांपेक्षा कारवाईवर भर देण्याची गरज आहे. मात्र, अनेकवेळा वाहतूक पोलिस, आरटीओ अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याने ऊस वाहतूक करणार्यांचे धाडस वाढते. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कडक कारवाईचा बडगा उगारला, तरच बेफिकीर आणि नियमबाह्य वाहतुकीस आळा बसून नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ रोखता येऊ शकतो, अशी प्रतिक्रिया सामान्यांतून व्यक्त होत आहे.