Krishna river touches Datta Padukas in Nrusinhwadi
कुरुंदवाड : अवघ्या सहा दिवसांतच कृष्णामाईने पुन्हा एकदा रौद्र-रम्य रूप धारण करत दत्त चरणी आपली सेवा रुजू केली. आज शुक्रवारी (दि.4) पहाटे नदीची पाणीपातळी ३१ फूट ५ इंचांवर पोहोचताच, या वर्षातील दुसरा 'दक्षिणद्वार सोहळा' हजारो भाविकांच्या साक्षीने अत्यंत भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सहा दिवसांपूर्वीच उतरता दक्षिणद्वार सोहळा झाल्याने आता पुन्हा पाणीपातळी वाढणार नाही, असे वाटत असतानाच कृष्णामाईने भक्तांच्या श्रद्धेला पुन्हा एकदा साद घातली. गुरुवारी दिवसभर केवळ चार इंच पाण्याची प्रतीक्षा होती, मात्र पावसाने उशीर लावल्याने भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर शुक्रवारी (दि,4) पहाटे, उगवत्या सूर्याच्या साक्षीने कृष्णेच्या पाण्याने दत्तपादुकांना स्पर्श केला आणि तो अलौकिक क्षण साकारला.
हा पुण्यसोहळा अनुभवण्यासाठी सांगली, कोल्हापूर, बेळगावसह कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक गुरुवार सायंकाळपासूनच नृसिंहवाडीत दाखल झाले होते. "हा केवळ पाण्याचा खेळ नसून, साक्षात दत्तप्रभूंची कृपा आहे," अशी भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली. कृष्णेचे वाढलेले पाणी म्हणजे जणू काही दत्तगुरूंच्या सेवेसाठी तिने घेतलेली धावच होती, असा अनुभव अनेकांनी कथन केला.
एकाच पावसाळ्यात दोनदा दक्षिणद्वार सोहळा संपन्न होणे, ही एक 'अभूतपूर्व' घटना मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर, श्री दत्त देवस्थान समिती आणि स्थानिक प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. नदीपात्रात सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात आली होती. कृष्णामाईचा प्रवाह आणि दत्तभक्तांची श्रद्धा यांचा हा अद्वैत संगम केवळ एक सोहळा नव्हता, तर निसर्ग आणि श्रद्धेच्या अतूट नात्याचे ते जिवंत दर्शन होते.