दाजीपूरच्या पर्यटन विकासाला ‘बूस्टर’ 
कोल्हापूर

Kolhapur Tourism : दाजीपूरच्या पर्यटन विकासाला ‘बूस्टर’

आर्टिफिशियल बीच आणि गॅझिबो पर्यटकांना भुरळ घालणार

पुढारी वृत्तसेवा

डॅनियल काळे

कोल्हापूर : निसर्गसौंदर्य, घनदाट वनराई, समृद्ध जैवविविधता आणि डोंगररांगांनी नटलेल्या दाजीपूर परिसराच्या पर्यटन विकासाला आता गती मिळणार आहे. दाजीपूर परिसर पर्यटनदृष्ट्या विकसित करणे आणि दाजीपूर जंक्शनची सुधारणा व सुशोभीकरण करण्यासाठी दीड कोटीहून अधिक रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या विकासकामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

दाजीपूर हे कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे निसर्ग पर्यटनस्थळ असून दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. पर्यटकांची वाढती संख्या आणि परिसराची पर्यटन क्षमता लक्षात घेऊन विविध पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध जागेचा योग्य वापर करून आकर्षक प्रवेशद्वार, जंक्शनचे सुशोभीकरण, वाहनतळ, अंतर्गत रस्ते, पादचारी मार्ग, बैठक व विश्रांती व्यवस्था, लँडस्केपिंग, वृक्षारोपण आणि आकर्षक विद्युत रोषणाई आदी कामे करण्यात येणार आहेत.

या प्रकल्पाचे विशेष आकर्षण ठरणार आहे आर्टिफिशियल बीच आणि गॅझिबो. पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळा मिळावा, यासाठी विविध मनोरंजनात्मक व विश्रांतीच्या सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. स्थानिक वास्तुशैली आणि दाजीपूरच्या नैसर्गिक वातावरणाशी सुसंगत अशी परिसराची रचना करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी इको टुरिझमसाठी जिल्हा नियोजन मंडळातून हा निधी दिला आहे. विकासकामांमुळे दाजीपूरच्या पर्यटनाला नवी ओळख मिळण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT