कोल्हापूर : जुगार अड्डे, कॅसिनोंतून जिल्ह्यात रोज दीडशे कोटींची उलाढाल! Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : जुगार अड्डे, कॅसिनोंतून जिल्ह्यात रोज दीडशे कोटींची उलाढाल!

यंत्रणांचा कानाडोळा; स्थानिक पंटरच्या मध्यस्थीने सारा मामला बिनभोबाट

पुढारी वृत्तसेवा
दिलीप भिसे

कोल्हापूर : स्थानिक यंत्रणांसह फाळकूट गुंडांना हाताशी धरून परप्रांतीय अवैध व्यावसायिक, गुन्हेगारी टोळ्यांनी शहर, जिल्ह्यात घुसखोरी केली आहे. पंधरवड्यापासून दोनशेवर जुगारी अड्डे फार्मात आले असून, त्यात कॅसिनोंची भर पडली आहे. सायंकाळी सहा ते पहाटेपर्यंत अड्डे गजबजू लागले आहेत. रोज सरासरी 150 कोटींची उलाढाल होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. सीमावर्ती भागात तर रात्रंदिवस हाऊसफुल्ल धंदा सुरू आहे.

तीन पानी जुगारी अड्ड्यांचे जिल्ह्यात विशेष करून महामार्ग, सीमाभागात अक्षरश: पेव फुटले आहे. गोव्यातील कॅसिनोची एन्ट्री गडहिंग्लज, आजरा, इचलकरंजीसह कागलपर्यंत पोहोचली आहे. रात्रंदिवस चालणार्‍या कॅसिनोंवर सीमाभागातील महाविद्यालयीन तरुणांसह व्यावसायिक, शेतकर्‍यांच्या पोरांची बरबादी होऊ लागली आहे. बँका, पतसंस्थांसह खासगी सावकारांकडून व्याजाने मोठ्या रकमा उचलून तरुण कॅसिनो अड्ड्यांवर पडून आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनांसह दागिने गहाण ठेवून अनेक जण भिकेकंगाल बनले आहेत. आजरा, चंदगड, गडहिंग्लजसह निपाणी, संकेश्वर, बेळगाव परिसरातील अनेक व्यावसायिक रस्त्यावर आले आहेत.

सांगली जिल्ह्यासह कर्नाटक, गोव्यातील सराईत गुंडांचा शिरकाव!

जुगार अड्ड्यांसह मटका बुकींविरोधात स्थानिक प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारल्याने सांगली, सातारा जिल्ह्यांतील तसेच कर्नाटक व गोव्यातील काळेधंदेवाल्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शिरकाव केला आहे. विशेषत: तीन पानी जुगार अड्डामालकांनी शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड, शहापूर, शिवाजीनगर, गावभाग, वडगाव, शिरोली एमआयडीसी, गोकुळ शिरगाव, हुपरी, गांधीनगर, कागल, आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, राधानगरी, भुदरगड परिसरात आसरा घेऊन छुपे अड्डे सुरू केले आहेत. अर्थात, स्थानिक प्रशासनाला अड्ड्यांची खबरबातच नाही असे नाही. स्थानिक पंटरच्या मध्यस्थीने सारा मामला बिनभोबाट सुरू आहे.

म्हमद्याच्या गुंडांची रात्रंदिवस वर्दळ

सांगलीतील कुख्यात गुंड आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या म्हमद्या नदाफच्या काही गुंड साथीदारांना सांगली पोलिसांनी शिरोळ तालुक्यातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून काही दिवसांपूर्वी जेरबंद केले होते. याचाच अर्थ सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटकातील कुख्यात गुंडांची जुगार अड्ड्यांवर वर्दळ असल्याचे स्पष्ट होते. जिल्ह्यातील काळेधंदे रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित एकीकडे गुन्हे आढावा बैठकीत अधिकार्‍यांची झाडाझडती घेत असतानाच दुसरीकडे मात्र स्थानिक पातळीवर काळेधंदेवाल्यांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठराखण केली जात असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे.

185 जुगार अड्ड्यांसह 15 कॅसिनो क्लब!

जिल्ह्यात सर्वाधिक जुगार अड्डे हातकणंगले तालुक्यासह शिरोळ, करवीर, कागल, गडहिंग्लज परिसरात सुरू आहेत. अलीकडे त्यात मोठ्या प्रमाणात भर पडल्याने ही संख्या 185 वर पोहोचली आहे, तर 15 ठिकाणी कॅसिनोंची एन्ट्री झाली आहे. कागलजवळील गणेशच्या कॅसिनोवर रोज सरासरी दीड ते दोन कोटींची उलाढाल असल्याचे सांगण्यात आले. गजबजलेल्या ठिकाणी हा अड्डा बिनभोबाट सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

गुटखा, बनावट दारू, अमली पदार्थांचे रतिबच!

आंतरराज्य गुटखा, बनावट दारू व अमली तस्करी टोळ्यांचीही उलाढाल वाढली आहे. निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर किंबहुना महामार्गावरील पोलिस बंदोबस्तात शिथिलता आल्यानंतर तस्करी टोळ्यांना मोकळीक मिळाली आहे. कोल्हापूर शहरासह गांधीनगर, हुपरी, इचलकरंजी, शिरोळ, वडगाव, कुरुंदवाड ही शहरे गुटखा तस्करीची सेंटर बनत चालली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT