कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक, पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा 80 वा वाढदिवस सहस्रचंद्रदर्शन सोहळा दिमाखदार होण्यासाठी जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी डॉ. प्रतापसिंह जाधव गौरव सत्कार सोहळा समितीच्या सदस्यांनी समारंभस्थळी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. बुधवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता पोलिस परेड ग्राऊंड येथे हा सत्कार सोहळा होणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा होणार आहे. यासाठी खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय संघटना तसेच तालीम मंडळांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेली गौरव सत्कार सोहळा समिती स्थापन करण्यात आली आहे.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोर्हे, विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोड हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गौरव समितीचे सदस्य अहोरात्र राबत आहेत. सोमवारी सायंकाळी समितीच्या काही सदस्यांनी पोलिस परेड ग्राऊंड येथे भेट देऊन सर्व तयारीचा आढावा घेतला. पोलिस परेड ग्राऊंडवर अत्याधुनिक पद्धतीचा जर्मन हँगर उभारण्यात आला आहे. यासाठी महासैनिक दरबार हॉल येथून प्रवेश दिला जाणार आहे. महासैनिक दरबार हॉल येथून पोलिस परेड ग्राऊंडवर जाण्यासाठी खास रस्ता तयार करण्यात आला आहे. महासैनिक दरबार हॉल तसेच त्याच्या समोरील मोकळ्या जागेत पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून हा लोकोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन आवाहन गौरव सोहळा समितीचे अध्यक्ष खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांनी केले आहे. कार्यक्रमासाठी येणार्या प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताकरिता त्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर तसेच शहरात स्वागत कमानी उभारण्यात येत आहेत. त्याचबरोबर शहरात सर्वत्र या कार्यक्रमाचे फलक लावण्यात आले आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार उदयनराजे भोसले, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, इतर मागास व बहुजन कल्याण, तसेच दुग्धविकासमंत्री अतुल सावे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कौशल्य रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा, वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नगरविकास राज्यमंत्री व कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, गृह राज्यमंत्री योगेश कदम हे या सोहळ्यासाठी खास करून उपस्थित राहणार आहेत.