कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने जानेवारी 2024 मध्ये सायबर दिंडी मोहीम राबवण्यात आली होती. सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा या संकल्पनेवर शहर व गावस्तरावरील सण, उत्सव, जत्रा, यात्रांमध्ये पथनाट्ये, नाटुकली, एकपात्री असे कार्यक्रम करून जागृतीची मशाल पेटवण्यात आली; मात्र गेल्या दीड वर्षात जिल्ह्यात सायबर गुन्हेगारीचा विळखा घट्ट झाला आहे. ‘सायबर दिंडी रस्त्यावर, अन् कष्टाचे पैसे भामट्यांच्या खात्यावर’ असे चित्र दिसत आहे.
अनेक नागरीक ओटीपी सांगणे, केवायसी करणे, चुकीच्या लिंकवर क्लिक करणे, अनोळखी व्यक्तीकडून येणार्या क्यूआर कोडचा वापर करणे अशा प्रकारच्या सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकतात. सायबर गुन्हेगार विविध संवाद माध्यमांद्वारे नागरिकांच्या बँक खात्यांवरील रक्कम लुटतात. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरीक, निवृत्त अधिकारी, महिलांना लक्ष्य केले जाते. दिवसेंदिवस वाढत असलेल्या सायबर गुन्हेगारीबाबत सावधानता बाळगावी याविषयी जागृती करण्यासाठी सायबर दिंडी या मोहिमेची सुरुवात 2 जानेवारी 2024 पासून करण्यात आली. वर्षभर सुरू असलेल्या या सायबर दिंडीला सहा महिन्यांपूर्वी ब—ेक लागला, तर दुसरीकडे सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीच्या घटनांची यादी वाढत आहे.
सायबर दिंडीअंतर्गत शहरातील भवानी मंडप, राजारामपुरी, मध्यवर्ती बसस्थानक, उद्याने या ठिकाणी विद्यार्थी तसेच स्थानिक कलाकार यांच्यामार्फत सायबर गुन्ह्यांविषयी जागृतीसाठी पथनाट्ये सादर करण्यात येत होती. जिल्ह्यात भुदरगड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड येथेही हा उपक्रम राबवण्यात आला. सायबर गुन्हेगार कशाप्रकारे आर्थिक फसवणूक करतात यावर सादरीकरण केले जात होते. प्रबोधनपर फलकांचाही समावेश होता. पोलिसदल व सायबर सेलचे कामकाज याचीही माहिती दिली जात होती. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सायबर दिंडीचा आवाज घुमला.
2023 मध्ये 3,534 सायबर गुन्हे नोंद झाले. त्यापैकी 1,468 तक्रारी निकाली काढण्यात सायबर सेलला यश आले; मात्र 2 हजारांपेक्षा जास्त प्रकरणे अद्यापही अनिर्णित आहेत. 2022 या वर्षात सायबर गुन्ह्याच्या तक्रारी निकाली काढण्याची टक्केवारी 81 टक्के होती; मात्र 2023 या वर्षात हेच प्रमाण 41 टक्क्यांवर आले. 2024 पासून गेल्या दीड वर्षात कोल्हापुरातील सायबर गुन्हेगारीच्या घटना वाढतच आहेत.