ATM fraud
वेळ रात्री ११च्या सुमाराची. एका कुरियर बॉयच्या वेशात एक तरुण एका बँकेच्या एटीएममध्ये प्रवेश करतो. त्याच्या हातात छोटे टूल किट आणि एक चॉकलेट बॉक्ससारखा डबा होता. त्याने काही मिनिटांत कार्ड स्लॉटवर एक स्किमिंग डिव्हाईस बसवले आणि कीपॅडवर पारदर्शक स्लीक 'ओव्हरले' कीपॅड ठेवला. हे सारं केल्यानंतरदेखील एटीएम मशिनमध्ये काहीच बदल जाणवत नव्हता. अगदी अधिकृत वाटावा असा सारा तो सेटअप होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी, अनंत आपला पगार काढण्यासाठी त्याच एटीएममध्ये जातात. त्यांनी कार्ड टाकले, पिन टाकला आणि १०,००० रुपये काढले. सर्व काही सामान्य वाटले. पण त्याच रात्री खात्यातून एटीएमद्वारे ३०,००० काढल्याचा मेसेज त्यांना येतो. अरे, मी तर घरी आहे आणि एटीएममधून पैसे कोणी काढले! आनंद यांना काही कळत नव्हते. त्यांनी चटकन बँकेच्या हेल्पलाईनला कॉल केला आणि कार्ड ब्लॉक केले. मात्र तोपर्यंत ते सायबर चोरट्यांच्या सापळ्यात पूर्णपणे अडकले होते.
ऑनलाईन व्यवहारांसह एटीएम आणि सीडीएमचा वापरही तितक्याच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे सायबर चोरट्यांकडून आता एटीएमला लक्ष्य करण्याचा डाव सुरू आहे. वायरलेस स्किमिंग डिव्हाईस वापरून सायबर चोरटे एटीएममधील सर्व डेटा चोरत आहेत. यामुळे आता एटीएममधून पैसे काढताना किंवा सीडीएममध्ये पैसे भरतानादेखील खबरदारी घेणे गरजेचे आहे.
आता सायबर चोरटे हे सारं करतात कसे, तर सर्वप्रथम एटीएम मशिनवर एक खास स्किमिंग डिव्हाईस लपवला जातो. हे डिव्हाईस कार्ड स्लॉटमध्ये बसवलेले असते आणि हे पाहताना खरे कार्ड स्लॉटच वाटतो. कधी कधी ते एटीएम कीपॅडवर कृत्रिम कीपॅड ठेवतात किंवा पिन टाकताना बघण्यासाठी एखादा छोटा कॅमेरा लपवतात.
ज्यावेळी तुम्ही सायबर चोरट्यांनी लक्ष्य केलेल्या एटीएममध्ये जाऊन कार्ड टाकता आणि पिन टाकून पैसे काढता तेव्हा तुमचे कार्ड स्किमिंग डिव्हाईसने स्कॅन केले जाते. म्हणजेच कार्डवरील सगळी माहिती कॉपी होते. पिन कीपॅड ओव्हरले किंवा कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्ड होतो.
ब्ल्यूटूथ/वायफायद्वारे सायबर चोरट्यांकडे ही सर्व माहिती थेट पोहोचते. मग ते स्कॅन केलेल्या माहितीवरून बनावट (क्लोन) कार्ड तयार करून एटीएममधून पैसे काढतो किंवा दुकानांमधून स्वाईप करून खरेदी करतो. कधी कधी तुमचा बँक लॉगिन वापरून ऑनलाईन ट्रान्सफरही केली जाते ! हा रचलेला सारा सापळा तुम्हाला लक्षात येईपर्यंत उशीर झालेला असतो ! कार्ड ब्लॉक करायच्या आधीच बँक अकाऊंट रिकामे झालेले असते.
* एटीएममध्ये कार्ड टाकताना कार्ड स्लॉट हलतो का, त्यावर काही चिकटवलेले आहे का हे तपासा.
* कीपॅडवर पारदर्शक लेअर किंवा वेगळा फील जाणवत असेल, तर ट्रान्झेक्शन थांबवा.
* पिन टाकताना एवढी अधिक सतर्कता बाळगा की, पिन कोणालाही सांगू नका. बँक अलर्टस् ऑन ठेवा.
* कोणताही अनोळखी व्यवहार दिसला की लगेच बँकेला कळवा व कार्ड ब्लॉक करा. शक्यतो संपर्करहित (कॉन्टॅक्टलेस) व्यवहार करा.