कोल्हापूर : दोनच दिवसांपूर्वी सायबर चौकाजवळ झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच त्याच ठिकाणापासून दोन्ही बाजूला अवघ्या 100 मीटर अंतरावर शुक्रवारी (दि. 12) रात्री पुन्हा दोन भीषण अपघात झाले. एका घटनेत रस्ता दुभाजकाला चारचाकी धडकून तिचा चक्काचूर झाला; तर दुसर्या घटनेत चारचाकीने अन्य एका चारचाकी व दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघेजण जखमी झाले.
शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास राजाराम महाविद्यालय ते सायबर चौक यादरम्यान चारचाकी (एम.एच. 09 जीयू 5940) चा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात सायबर चौकाकडे येणार्या या चारचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुभाजकाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर त्याच वेगाने चारचाकी सुमारे 15 फूट उंच उडून दुभाजकामध्ये असलेल्या हायमास्टच्या खांबावर आदळली आणि त्याच बाजूला मात्र विरुद्ध दिशेला तोंड करून उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, या चारचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामधील चालक जखमी झाला. त्याला कारमधून बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघात इतका भीषण होता की, दुभाजकाच्या कठड्याचा भाग, कारचे पार्टस् तुटून शिवाजी विद्यापीठाकडे जाणार्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर पडले होते. हायमास्टच्या खांबाला चारचाकी धडकली, तो खांबही निम्म्यातून अक्षरश: वाकला. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
अपघाताची ही घटना ताजी असतानाच काही वेळातच राजारामपुरी ते सायबर चौक मार्गावर दत्त दुग्धालयासमोर एका भरधाव चारचाकी (एम.एच. 09 डीए 9193) ने दुचाकीला चुकवताना रस्त्यावर थांबलेल्या एका चारचाकी (एम.एच. 09 सीएम 0503) ला धडक दिली. यानंतर कारची त्या दुचाकी (एम.एच. 10 सीसी 9176) लाही धडक बसली. चारचाकीचा वेग इतका होता की, धडक दिल्यानंतर या चारचाकीतल्या दोन्ही एअर बॅग उघडल्या. त्याचबरोबर कार दुभाजकाला जाऊन धडकल्याने तिचाही चक्काचूर झाला आणि ती विरुद्ध दिशेला तोंड करून उभी राहिली. ही धडक इतकी भीषण होती की, ज्या चारचाकीला धडक बसली तिचे मागचे चाक निखळून बाजूला जाऊन पडले. या दोन्ही अपघातांची नोंद करण्याचे काम राजारामपुरी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत सुरू होते.