कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम संथ गतीने झाले, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा रंगकर्मींनी दिल्यानंतर खासदार शाहू महाराज यांनी शुक्रवारी अधिकारी, रंगकर्मी, आर्किटेक्ट, अभियंते आणि ठेकेदार यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती. यात सर्व शंकांचे निरसन झाल्यानंतर खासदार शाहू महाराज यांनी नाट्यगृह कामाच्या दर्जामध्ये कोणतीही तडजोड न करता हे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना केल्या. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आ. राजेश क्षीरसागर यांनी या कामाला लागेल तेवढा निधी देऊ, असे आश्वासन दिले.
केशवराव भोसले नाट्यगृहाला दि. 8 ऑगस्ट 2024 रोजी आग लागली होती. या आगीमध्ये नाट्यगृह जळून खाक झाले. कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे नाट्यगृह जसेच्या तसे उभे करण्यासाठी पहिल्यांदा 10 कोटी, त्यांनतर 25 कोटी रुपये दिले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या कामांना सुरुवात झाली. चार वेगवेगळ्या टप्प्यांत काम सुरू झाले, अशी माहिती प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. कोणत्या टप्प्यात कोणते काम आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर आर्किटेक्ट रविकिशोर माने, संदीप घाटगे यांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केले. त्याला ठेकेदार व सल्लागार मंडळाच्या प्रतिनिधींनी समर्पक उत्तरे दिली.
व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार आदींनी प्रश्न उपस्थित केले. रंगकर्मींच्यावतीने आनंद काळे यांनी कामे गतिमान व दर्जेदार होण्यासाठी आंदोलन असल्याचे स्पष्ट केले. विजय देवणे, बाबा पार्टे, महादेवराव आडगुळे, बाळ पाटणकर, दिलीप पवार, अमरजा निंबाळकर व विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते.
आग कोणी लावली, याचे उत्तर द्या
अॅड. बाबा इंदूलकर म्हणाले, नाट्यगृहाला आग कोणी लावली, या प्रश्नाचे उत्तर का देत नाही. दिलीप देसाई म्हणाले, गॅलरीची उंची दोन फुटांनी कमी करण्याचे कारण काय. अभियंत्यांनी पोलिस तपास करत आहेत. त्यांच्या चौकशीनंतरच या प्रश्नाचे उत्तर मिळेल, असे सांगितले. गॅलरीची उंची केवळ पाच इंचांनी कमी झाल्याने फरक पडत नसल्याचे सल्लागार कंपनीने सांगितले.