जयसिंगपूर, पुढारी वृत्तसेवा : खंडणीसाठी पान टपरीवर मारहाण करून खंडणी मागणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार संदीप रामू भोसले (वय 32, रा. 52 झोपडपट्टी शाहूनगर, जयसिंगपूर) याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्याकडे येत होते. दरम्यान, जयसिंगपूर येथील क्रांती चौकात चारचाकी वाहन आले असता चालत्या गाडीचा दरवाजा उघडून संशयित आरोपी भोसले पळून जात होता. मात्र, मोठी तत्परता दाखवून पो.कॉ. अमोल अवघडे यांनी संशयिताच्या पुन्हा मुसक्या आवळल्या.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवार रात्री रेकॉर्डवरील गुन्हेगार संदीप भोसले हा खंडणीसाठी पान टपरीवर येऊन मारहाण करून खंडणी मागत असल्याची तक्रार विनायक पाटील यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्याला दूरध्वनीद्वारे दिली. यावेळी तातडीने जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार अमोल अवघडे व राऊत हे घटनास्थळी जाऊन संबंधित संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्याकडे घेऊन येत होते.
यावेळी येथील क्रांती चौकात आल्यानंतर संबंधित संशयित आरोपी हा पोलिस अंमलदार पोलिस कर्मचारी राऊत यांना हिसडा मारून चालू गाडीचा दरवाजा उघडून पळून जात होता.
यावेळी पोलिस अंमलदार अमोल अवघडे यांनी आपली ड्रायव्हिंग सीट सोडून चालत्या गाडीतून उडी मारली. यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता संबंधित संशयित आरोपी भोसले याला पकडून जयसिंगपूर पोलिस ठाण्यात हजर केले. भोसले यांच्यावर जयसिंगपूर व शिरोळ पोलिसांत गुन्हे 5 दाखल आहे.