TET exam and election Pudahri
कोल्हापूर

TET exam and election | निवडणूक ड्युटी की सीटीईटी परीक्षा? शिक्षकांची 'दहेदशा'; प्रशासन काय निर्णय घेणार?

एकीकडे 'राष्ट्रीय कर्तव्य' आणि दुसरीकडे 'भविष्याची संधी' अशा कात्रीत शिक्षक अडकले

पुढारी वृत्तसेवा

सुभाष पाटील

विशाळगड : राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहत असून, प्रशासकीय यंत्रणा मतदानाच्या तयारीला लागली आहे. मात्र, ७ फेब्रुवारी रोजी होणारे मतदान आणि नेमकी त्याच काळात आलेली 'सीटीईटी' (CTET) परीक्षा यामुळे शिक्षक मोठ्या पेचात सापडले आहेत. एकीकडे 'राष्ट्रीय कर्तव्य' आणि दुसरीकडे 'भविष्याची संधी' अशा कात्रीत शिक्षक अडकले असून, प्रशासनाने यावर सुवर्णमध्य काढावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

नेमका पेच काय?

​७ तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी हजारो प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची 'निवडणूक निर्णय अधिकारी' व 'मतदान अधिकारी' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियमानुसार, मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे ६ तारखेलाच साहित्यासह केंद्रावर पोहोचणे अनिवार्य आहे. ​दुसरीकडे, ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारतर्फे घेतली जाणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) आयोजित करण्यात आली आहे. अनेक शिक्षकांनी व्यावसायिक प्रगतीसाठी या परीक्षेचे अर्ज भरले आहेत. विशेष म्हणजे, अनेकांची परीक्षा केंद्रे ही राहत्या घरापासून दूर दुसऱ्या जिल्ह्यात आली आहेत.

शिक्षकांच्या प्रमुख अडचणी

​ प्रवास आणि वेळ: ७ तारखेला ड्युटीवर असताना त्याच दिवशी दुसऱ्या शहरात परीक्षा देणे अशक्य आहे.

​ कारवाईची भीती: निवडणूक ड्युटीला गैरहजर राहिल्यास प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार असते.

​ संधी हुकण्याची भीती: CTET परीक्षा वर्षातून ठराविक वेळीच होते, त्यामुळे ही संधी हुकल्यास शिक्षकांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

मागणी काय?

शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी आणि निवडणूक विभागाकडे धाव घेतली असून, ज्या शिक्षकांचे परीक्षेचे 'हॉल तिकीट' उपलब्ध आहे, त्यांना निवडणूक कामातून तात्पुरती सवलत देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. आता यावर प्रशासन लवचिक भूमिका घेणार की शिक्षकांना आपल्या करिअरवर पाणी सोडावे लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​"निवडणूक कर्तव्य पार पाडणे आमची जबाबदारी आहेच, पण स्व-विकासासाठी महत्त्वाची असलेली परीक्षाही तितकीच आवश्यक आहे. प्रशासनाने ज्या शिक्षकांची परीक्षा आहे, त्यांना ड्युटीतून सवलत द्यावी किंवा त्यांच्या जागी पर्यायी व्यवस्था करावी."
अंकुश पाटील, शिक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT