प्रवीण मस्के
कोल्हापूर : कॉर्पोरेट क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार्या कंपनी सचिव (सीएस) अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा ‘आयसीएसआय’ने पॅटर्न बदलला आहे. जागतिक दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी तीन लेखी व एक बहुपर्यायी (एमसीक्यू) पेपर अशी नवी रचना लागू केली आहे. परीक्षेची काठिण्य पातळी लक्षणीय वाढवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता केवळ हुशारीवर नव्हे, तर सखोल अभ्यासावर भर द्यावा लागणार आहे.
सध्याच्या स्पर्धात्मक युगात कंपन्यांना केवळ पदवीधर नको, तर कुशल व अद्ययावत ज्ञान असलेले तज्ज्ञ हवे आहेत. यासाठी ‘आयसीएसआय’ने रचनेत मोठे बदल करीत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘सीएस’ प्रवेश परीक्षेच्या वारंवारतेबाबत असलेल्या मर्यादा दूर करत ‘आयसीएसआय’ने ही परीक्षा वर्षातून तीन वेळा घेण्याचे नियोजन केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. त्यांचा शैक्षणिक वेळ वाचण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यावर भर दिला आहे. प्रत्येक पेपर 100 गुणांचा असेल. तीन लेखी पेपर तीन तासांचे तर ‘एमसीक्यू’ पेपर दोन तासांचा असणार आहे.
आर्थिकद़ृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी ‘सीएस’ अभ्यासक्रमात शिष्यवृत्तीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यासोबत नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मंडळाने विविध विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत. केवळ परीक्षा घेणे हाच उद्देश न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आयसीएसआय’ सक्रिय झाली आहे. ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष मार्गदर्शन केंद्रांची व्याप्ती वाढवली जाणार आहे. नव्या अभ्यासक्रमात केवळ सैद्धांतिक माहितीवर भर न देता प्रात्यक्षिक अनुभव आणि इंटर्नशिपला अधिक महत्त्व दिले जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पदवी मिळताच रोजगाराच्या संधी मिळतील.
दर तीन वर्षांनी अभ्यासक्रमात बदल
कॉर्पोरेट जगतातील कायदे, तंत्रज्ञान व नियमावली वेगाने बदलत आहेत. ही बाब विचारात घेऊन ‘आयसीएसआय’ने दर तीन वर्षांनी अभ्यासक्रम सुधारित करणार आहे. या निर्णयामुळे नवीन पिढीतील कंपनी सचिवांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), डेटा प्रायव्हसी व आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट गव्हर्नन्स यांसारख्या आधुनिक विषयांचे सखोल ज्ञान मिळणार आहे.
जगात विविध क्षेत्रात बदल होत आहेत. कार्पोरेट क्षेत्रातील बदलाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये पदवीबरोबर कौशल्य विकसित करण्यासाठी हे बदल केले आहेत. पारंपरिक व ‘सीएस’चा विद्यार्थी यात फरक दिसणार आहे. उद्योगांना गरजा लक्षात घेऊन आवश्यक असे मुनष्यबळ यातून मिळणार आहे.सीए स्वप्निल पाटोळे, चेअरमन, ‘सीएस’ चॅप्टर कोल्हापूर विभाग