जयसिंगपूर : संभाजीपूर उपनगरात मोठ्या प्रमाणात स्‍टोन क्रशर सुरू असून यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. 
कोल्हापूर

kolhapur | क्रशर्सच्या धुळीमुळं नागरिकांच्या आरोग्याचं ‘खोबरं’!

परिसरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात श्वसनविकार वाढले

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर; विशेष प्रतिनिधी : संभाजीपुरातील क्रशर्सच्या अफाट धुळीमुळे केवळ जयसिंगपूर शहरच नव्हे, तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचं अक्षरश: ‘खोबरं’ झालं आहे. वेगवेगळ्या आजारांनी आबालवृद्ध त्रस्त झाले आहेत. पण क्रशर चालकांच्या दहशतीमुळे कुणी याबद्दल आवाज उठवायला तयार नाही.

इथले दोन डझनहून अधिक स्टोन क्रशर्स रात्रंदिवस सुरू असतात. त्यामुळे या भागात धुळीचे लोटच्या लोट उठून गगनाला भिडलेले दिसतात. या भागात दहा-पंधरा मिनिटे उभे राहिले तरी अंगावर धुळीचा थर साचतो. त्यावरून या भागात राहणाऱ्या लोकांना किती भयावह समस्येचा सामना करावा लागत असेल, याचा अंदाज येण्यास हरकत नाही. या भागात फिरताना नाकातोंडात क्रशर्सच्या धुळीचे लोट जाऊन अक्षरश: गुदमरायला होतं. अशा परिस्थितीत या भागात कायमस्वरूपी राहणाऱ्या लोकांचे काय हाल होत असतील याची कल्पनाच केलेली बरी!

गुदमरतायत विद्यार्थी : या भागात एक शाळा आहे. जवळपास दोन ते तीन हजार विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत. पण या शाळेतही धुळीचे लोट शिरत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव गुदमरून अक्षरश: कासावीस होतो. पण शाळेतील शिक्षक आणि पालकही या क्रशर्सच्या धुळीबद्दल तक्रार करायला धजावत नाहीत. कारण इथल्या क्रशर्स चालकांची तशी दहशतच आहे. विद्यार्थ्यांचा हा कोंडमारा बंद करायचा असेल तर इथले क्रशर्स बंद करण्याशिवाय पर्याय नाही.

नेत्यांचा मतावर डोळा : इथले क्रशर्स चालक हे एका विशिष्ट समाजाचे असून या भागात त्यांची जवळपास सात ते आठ हजार मते आहेत. या मतांच्या बेगमीसाठी या भागातील एक लोकप्रतिनिधी या क्रशर चालकांच्या बेकायदा व्यवसायाला अभय देत असल्याची या भागात चर्चा आहे. सात-आठ हजार मतांसाठी या भागातील इतर हजारो मतदारांच्या आरोग्याचा सौदा मांडण्याचा हा प्रकार खरोखरच दुर्दैवी समजायला पाहिजे. एकासाठी दुसऱ्याचा बळी देण्याचा हा प्रकार आहे.

दवाखान्याचा खर्च वाढला : या भागात राहायला आल्यापासून आपल्या कुटुंबाचा दवाखान्याचा खर्च भरमसाट वाढल्याचा दावा या भागातील नागरिकांनी केला आहे. बहुतेकांना प्रामुख्याने श्वसन विकारांनी हैराण करून सोडले आहे. त्यामुळे याबाबतीत तातडीने कारवाई करून क्रशर्स तातडीने बंद करण्याची या भागातील लोकांची मागणी आहे.

श्वसन विकारांना आमंत्रण! क्रशर्समधून बाहेर पडणारी धूळ ही आरोग्याचा दृष्टिकोनातून अत्यंत धोकादायक आहे. या धुळीचा पहिला परिणाम श्वासनलिकांवर होऊन श्वास नलिकांची कार्यक्षमता कमी व्हायला लागते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी श्वसन मार्गातील वायुकोष अकार्यक्षम बनायला सुरुवात होते. त्याचा परिणाम थेट रक्ताभिसरण क्षमतेवर होतो. सर्वात घातक परिणाम हा फुफ्फुसांवर होतो.
डॉ. अनिल मडके, श्वसन विकारतज्ज्ञ, सांगली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT