जयसिंगपूर : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठाची महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण अखेर वर्षभरानंतर स्वगृही परतली. शुक्रवारी मध्यरात्री आगमन झालेल्या माधुरीला पाहण्यासाठी शनिवारी पहाटेपासूनच महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील भाविकांची गर्दी उसळली होती. मोबाईलमध्ये ‘माधुरी’चा फोटो घेण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरू होती.
उच्चस्तरीय समितीच्या परवानगीनंतर वनतारा येथून माधुरीचे रात्री १२.४० च्या सुमारास नांदणी येथील गांधी चौकात आगमन झाले. हजारोंच्या जनसमुदायाने तिचे अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत केले. रात्री १.५० च्या सुमारास निशिधिकेच्या जवळ ॲनिमल ॲम्ब्युलन्समधून तिला सुरक्षितपणे खाली उतरवले. तेथून तिने निवासस्थानात मंगल प्रवेश केला. शनिवारी पहाटेपासूनच नांदणी परिसरात भाविकांचा ओघ सुरू झाला. दिवसभर संपूर्ण परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. सुरक्षिततेच्या कारणास्तव कडक पोलिस बंदोबस्तात लांबूनच तिचे दर्शन घेण्याची व्यवस्था केली होती.
वनताराच्या धर्तीवर दिनक्रम
‘माधुरी’ला ३२ तासांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर पुरेशी विश्रांती देण्यात आली. विशेष निवासस्थानात खाण्या-पिण्यापासून ते स्वच्छता आणि आरोग्याची उत्तम काळजी घेतली जात आहे. वनताराची दिनचर्या आता नांदणीतही लागू करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर फक्त माधुरीच…
नांदणी मठात माधुरी हत्तिणीच्या आगमनावेळी हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. युवक, रिल्स स्टारनी माधुरी आगमनाच्या रिल्स बनवून त्या सोशल मीडियावर टाकल्याने सोशल मीडियावर फक्त माधुरी आणि माधुरीच दिसत असल्याचे चित्र आहे.
कन्नड शब्दावर माधुरीची कृती
माधुरी हत्तिणीला शनिवारी दुपारी एकच्या सुमारास स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी व धर्मकिर्ती स्वामीजींच्या उपस्थितीत तिच्यासाठी उभारण्यात आलेल्या स्विमिंग टँकमध्ये पोहण्यासाठी सोडण्यात आले. यावेळी इस्माईल चाचा कन्नड भाषेत ‘माधुरी तळांग खुड, मुंद्द होग…’ (मराठीत ‘माधुरी खाली बस, पुढे जा’) असे म्हणताच माधुरीने सांगेल तशी कृती करायला सुरुवात केली. चाचा गेल्या १० वर्षांपासून ज्या कन्नड भाषेत बोलतात, ती भाषा माधुरीच्या स्मरणात असल्याचे दिसून आले. सुमारे तासभर पोहल्यानंतर तिला पुन्हा निवासस्थानी नेऊन विश्रांती देण्यात आली.