जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठाची लाडकी महादेवी ऊर्फ माधुरी हत्तीण वर्षभरानंतर नांदणीत परतली आहे. दरम्यान, रविवारीही दिवसभर माधुरी हत्तिणीला पाहण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, नांदणी येथे रविवारी प्रथमाचार्य श्री १०८ शांतिसागरजी महाराज यांचा ७१ वा पुण्यतिथी महामहोत्सव झाला. त्यामुळे माधुरी हत्तीणीचे दर्शन आणि कार्यक्रम यामुळे नांदणीत मोठी गर्दी पहायला मिळाली. माधुरीच्या पुनरागमनासोबतच दोन अनोख्या व भावनिक घटनांची मोठी चर्चा नागरिकांमध्ये रंगली. माधुरी जोपर्यंत नांदणीत परत येत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा नांदणीचे अक्षय पाटील यांनी केली होती. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली. माधुरी परतल्यामुळे माधुरी बचाव कृती समितीच्या वतीने अक्षय पाटील यांना चपला प्रदान करुन त्यांचा हा पण पूर्ण करण्यात आला.
तर, नांदणीचे माजी उपसरपंच डॉ. सागर पाटील यांनी माधुरीच्या विरहात आणि तिच्या परतीच्या मागणीसाठी लाक्षणिक उपोषणापासून थेट ती परत येईपर्यंत दररोज फक्त एकच वेळ जेवण्याचा नियम पाळला होता. माधुरीच्या यशस्वी आगमनानंतर कृती समितीने त्यांना पेढा भरवून त्यांचा हा उपवास सोडवला. या दोन्ही घटनांनी नांदणीकरांचे या मुक्या प्राण्यावरील अथांग प्रेम व जिव्हाळा पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
सध्या माहूत इस्माईल चाचा आणि त्यांची संपूर्ण टीम ‘वनतारा’च्या मार्गदर्शक सुचनांनुसार माधुरीच्या दैनंदिन दिनक्रमाचे तंतोतंत पालन करत आहे. यामध्ये सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तिचे नियोजनबद्ध खाणे, पिणे, व्यायाम, नियमित फेरफटका, अंगाची स्वच्छता, तसेच तेल आणि मालिश करण्याचे विशेष उपचार अत्यंत शिस्तीने हाती घेण्यात आले आहेत. दरम्यान, गर्दी होत असल्याने माधुरीच्या सुरक्षिततेसाठी दुरूनच नागरिकांना पाहण्याची सोय करण्यात आली आहे.