कोल्हापूर : दिवाळीच्या सुट्ट्या आणि रविवारच्या वीकेंडचे औचित्य साधत करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची रविवारी मोठी गर्दी झाली. राज्यासह परराज्यांतून आलेल्या भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर गजबजून गेला. सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी उभारलेला तात्पुरता मंडप भाविकांनी भरून गेला. दर्शनाची रांग थेट जुना राजवाडा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचली होती. सायंकाळपर्यंत गर्दीचा ओघ कायम असल्याने देवीच्या दर्शनासाठी भाविकांना सुमारे दोन ते तीन तास प्रतीक्षा करावी लागत होती.
अंबाबाईदेवीच्या दर्शनासोबतच जोतिबा, नृसिंहवाडी, पन्हाळा आणि दाजीपूर जंगल सफारीला पर्यटकांची पसंती मिळाली. तसेच टाऊन हॉल, न्यू पॅलेस आणि कणेरीमठ येथेही पर्यटकांची वर्दळ वाढली होती. भाविकांच्या गर्दीचा परिणाम शहरातील वाहतुकीवरही जाणवला. लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, ताराबाई रोड, मिरजकर तिकटी आदी परिसरात वाहनांची गर्दी होती. याशिवाय दसरा चौक, भवानी मंडप, रंकाळा परिसरातील पार्किंग स्थळेही वाहनांनी हाऊसफुल्ल होती. दरम्यान, भाविक, पर्यटकांच्या गर्दीने हॉटेल्स, खानावळी, रेस्टॉरंट आणि यात्री निवास व्यवसायाला चालना मिळाली.
दोन दिवसांत १ लाख १२ हजारांवर भाविकांची गर्दी
दिवाळी सुट्ट्या आणि विकेंडमुळे शनिवार, रविवार अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. शनिवारी १ लाख २३ हजार १०८, तर रविवारी ८९ हजार ४०६ इतक्या भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.