जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री जोतिबाचा तिसरा खेटा भाविकांच्या अलोट गर्दीत रविवारी झाला. गुलाल-खोबर्याच्या उधळणीत परिसर गुलालमय झाला.
पहाटे चार वाजल्यापासूनच दख्खनचा राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. पहाटे चार वाजता मंदिराचे दरवाजे उघडले. पाद्यपूजा व काकड आरती सोहळा झाल्यानंतर सकाळी आठ वाजता श्री जोतिबासह सर्व देवतांना अभिषेक घालण्यात आला. यानंतर श्री जोतिबाची खडी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली. दुपारी साडेअकरा वाजता उंट घोडे, मानकरीसह श्रींचा धुपारती सोहळा झाला. पार्किंग तळ वाहनांनी भरून गेले होते. सायंकाळी श्रींचा पालखी सोहळा गुलाल- खोबर्याची उधळण करत झाला.
पालखी सोहळ्याला, देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, सिंधिया देवस्थान समितीचे व्यवस्थापन अजित झुगर, गावकर प्रतिनिधीसह पुजारी, भाविक उपस्थित होते. जोतिबाच्या खेट्यासाठी रविवारी असंख्य भाविक पायी चालत कुशिरे मार्गे जोतिबा देवाच्या दर्शनासाठी येत असतात. येताना भाविकांकडून वाटेत लावलेल्या वृक्षांना पाणी घालण्यात आले. तसेच स्वच्छता करण्यात आली.