लाडक्या गणरायाच्या विसर्जनासाठी खण परिसरात गर्दी 
कोल्हापूर

Kolhapur : इराणी खण परिसरात घुमला बाप्पांचा जयघोष

लाडक्या गणरायाच्या विसर्जनासाठी खण परिसरात गर्दी : पोलिस, महापालिकेची चोख यंत्रणा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गणेशभक्तांच्या गर्दीने इराणी खण परिसर गजबजला. चिरमुर्‍यांची उधळण करत घरगुती बाप्पांचे विधिवत विसर्जन करण्यात आले. 15 तराफे, स्वयंचलित क्रेनच्या माध्यमातून खणीत मूर्ती विसर्जित करण्यात आल्या.

दुपारी दोनपासूनच इराणी खणीत मूर्ती विसर्जनाची लगबग सुरू होती. लहान मुलांपासून सहकुटुंब बाप्पांना अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. खणीच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या पोलिस बूथवरून दिलेल्या सूचनांचे पालन करत भक्तांनी शिस्त पाळून शांततेत विसर्जन केले. दुपारी दीडनंतर पावसाची काहीशी उघडझाप सुरू झाली. इराणी खणीच्या दिशेने बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी येणार्‍यांमध्ये उत्साहाला भरती आली होती. बहुतांशी लोकांनी बाप्पांच्या मूर्तीवर छत्री धरली होती. खणीकडे जाणारी वाट निसरडी झाल्याने वेळोवेळी काळजी घेण्याची सूचना दिली जात होती. परिसरातील कठडे, काठावरील रिकामी जागा बघून बाप्पांच्या निरोपाच्या आरतीचे सूर घुमत होते.

15 तराफे, स्वयंचलित क्रेन सुविधा

मूर्ती विसर्जनासाठी महापालिका यंत्रणेच्या वतीने दिलेल्या साध्या व फ्लोटिंगच्या तराफ्यांचा वापर केला जात होता. यंदा प्रथमच घरगुती गणेशमूर्तींसाठी ठेवलेल्या स्वयंचलित क्रेनलाही प्रतिसाद मिळाला. सकाळी दहा वाजल्यापासून इराणी खण परिसरात मूर्ती विसर्जनाला सुरुवात झाली असली तरी दुपारी दोननंतर गर्दी वाढली.

बापट कॅम्प परिसर

बापट कॅम्प परिसरात मूर्ती दान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महापालिकेच्या वतीने दहा ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जन कुंड ठेवले होते. बापट कॅम्प, जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत, वालावलकर हायस्कूलचे मैदान, शेळके यांच्या घरासमोर कुंड होते. सुमारे एक हजारावर मूर्ती दान झाल्या. माजी नगरसेवक राजसिंह शेळके, माजी नगरसेविका स्मिता माने, उपशहर अभियंता निवास पोवार यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. काही भाविकांनी बापट कॅम्प येथील नदी पात्रात मूर्तींचे विसर्जनाचा प्रयत्न केला. भाविकांची समजूत काढल्यानंतर त्यांनीही मूर्ती दान केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT