Blood Shortage | राज्यभरात रक्ताचा अभूतपूर्व तुटवडा; संकलन कमी, मागणी जास्त File Photo
कोल्हापूर

Blood Shortage | राज्यभरात रक्ताचा अभूतपूर्व तुटवडा; संकलन कमी, मागणी जास्त

दैनंदिन संकलन अन् गरजेमध्ये 1300 ते 2200 बाटल्यांची तफावत; रक्तपेढ्यांची होतेय कसरत

पुढारी वृत्तसेवा

सुनील कदम

कोल्हापूर : राज्यात दिवसेंदिवस रक्ताचा अभूतपूर्व तुटवडा जाणवू लागला आहे. दैनंदिन रक्त संकलन आणि गरजेमध्ये तब्बल 1300 ते 2200 बाटल्यांची तफावत दिसून येत आहे. रक्ताची मागणी आणि संकलनातील ही तफावत भरून काढता काढता राज्यातील रक्तपेढ्यांच्या अक्षरश: नाकीनऊ येऊ लागले आहे.

राज्यात वेगवेगळ्या कारणांनी रक्ताची गरज वाढत चालली आहे. महाराष्ट्रात 75 हजारांहून अधिक हिमोडायलेसिसचे रूग्ण आहेत. 12 हजारांहून अधिक थॅलेसेमियाचे रूग्ण आहेत. शिवाय हजाराहून अधिक रक्ताच्या कर्करोगाचे रूग्ण आहेत. अशा रुग्णांना सातत्याने आणि नियमितपणे रक्ताची आवश्यकता भासते. वेळेवर आणि हव्या त्या गटाचे रक्त मिळाले नाही, तर अशा रुग्णांच्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे बहुतांश रक्तपेढ्यांना आणि रुग्णालयांना अशा स्वरूपाच्या रुग्णांसाठी आवश्यक त्या गटाचे रक्त राखीवच ठेवावे लागते. त्यामुळे आणिबाणीच्या वेळी रक्ताची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी बहुतांश रक्तपेढ्यांना मोठी धावाधाव आणि कसरत करावी लागते.

अपघातांचे वाढते प्रमाण!

दिवसेंदिवस राज्यात अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. आजघडीला राज्यात दिवसाकाठी किमान 99 गंभीर स्वरूपाचे अपघात होतात आणि त्यामध्ये बळी पडणार्‍यांचे प्रमाण 43 हून अधिक आहे. अशा अपघातांच्या वेळी रुग्णालयांकडून जादा रक्ताची मागणी होताना दिसते. प्रामुख्याने राज्यातील महामार्गालगतच्या शहरांमधून अपघातप्रसंगी रक्ताची मागणी वाढताना दिसत आहे.

शहरी भागात रक्त संकलनात मोठी कमतरता

प्रामुख्याने मोठ्या आणि मल्टिस्पेशालिटी रूग्णालयांची संख्या शहरी भागात अधिक आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी दररोज मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता भासते. पण, नेमके शहरी भागातच गरजेच्या तुलनेत रक्त संकलनाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येते. बहुतांश शहरी भागामध्ये हेच चित्र आहे. त्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये रक्त संकलनाचे प्रमाण जास्त असल्याचे जाणवते.

ठोस उपाय आवश्यक

अशाप्रकारे रक्ताची वाढती मागणी आणि संकलनात दिवसेंदिवस होत चाललेली तूट भरून काढता काढता राज्यभरातील रक्तपेढ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. अनेकवेळा आवश्यक त्या प्रमाणात आणि आवश्यक त्या गटाचे रक्त उपलब्ध होत नसल्याने काही रक्तपेढ्यांना तर रूग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे राज्यातील रक्ताचा हा तुटवडा भरून काढण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे जाणवते.

शस्त्रक्रिया आणि रक्त

राज्यातील खासगी आणि शासकीय रूग्णालयांमध्ये दररोज हजारो पद्धतीच्या हजारो शस्त्रक्रिया केल्या जातात. अशा शस्त्रक्रियांच्या वेळी रक्ताची मोठी आवश्यकता असते. अशाप्रसंगी अनेकवेळा रूग्णांचे नातेवाईक किंवा मित्रमंडळींकडून रक्तदान करून रक्ताचा पुरवठा केला जातो, पण प्रत्येकवेळी असे होईलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे अशा रूग्णांसाठीही रक्ताची मागणी वाढताना दिसत आहे. अनेक रूग्णालयांमध्ये तर रक्ताअभावी किंवा आवश्यक त्या गटाचे रक्त उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक रूग्णांच्या शस्त्रक्रिया लांबणीवर पडलेल्या दिसतात.

राज्यातील रक्त संकलन एक द़ृष्टीक्षेप

300 हून अधिक शासकीय आणि खासगी रक्तपेढ्या आहेत राज्यात

21 ते 22 लाख बाटल्या रक्त संकलन होते वर्षाला रक्तपेढ्यांतून

5,700 ते 6,000 बाटल्या दिवसाला केले जाते रक्ताचे संकलन

6,800 ते 8,200 बाटल्यांची मागणी राज्यातील रुग्णालयांची दिवसाला

25 ते 30 लाख बाटल्यांची मागणी वर्षाला राज्यातील रुग्णालयांकडून

04 ते 08 लाख बाटल्यांचा वार्षिक तुटवडा कसा भरून काढायचा हा प्रश्न

1,500 ते 2,000 बाटल्यांची गरज मुंबई-पुण्यासारख्या शहरांत रोज

700 ते 900 बाटल्या इतकेच आहे या शहरांतील रक्त संकलनाचे प्रमाण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT